बांदा : इनॅमल आर्ट अर्थात मिनाकारी या कलेत विशेष प्रावीण्य प्राप्त केलेला बांद्याचा युवा कलाकार मेघन रामकृष्ण साळगावकर याने जागतिक पातळीवर आपली यशस्वी वाटचाल सुरूच ठेवली आहे. त्याने जर्मनी व हंगेरीचा दौरा केला. यावेळी केचकेमेट येथे आयोजित करण्यात आलेल्या ४१ व्या आंतरराष्ट्रीय इनॅमल कलाकृती प्रदर्शनात मेघनच्या कलाकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच जर्मनी येथे आयोजित १६ व्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्येही त्याने विशेष निमंत्रित कलाकार म्हणून सहभाग घेतला.मेघन याने युरोप दौरा केला. हंगेरीयन इंटरनॅशनल इनॅमन आर्ट स्टुडियोला ४0 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेमध्ये मेघनच्या कलाकृतीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यंदाच्या ४१ व्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मेघन याने सादर केलेली कलाकृती सर्वोत्तम ठरली. जर्मनीचा सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या एयरफर्ट येथे १६ वी आंतरराष्ट्रीय इनॅमल कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यासाठी जगभरातून निमंत्रित १0 कलाकारांमध्ये मेघन हा एकमेव भारतीय होता. तेथील प्रसिद्ध अशा कुन्सलर वर्केन्स्टॅन्स स्टुडियोमध्ये आयोजित प्रदर्शनात त्याने सहभाग घेतला. तिथे अभिप्राय लिहिताना मेघनने मराठी भाषेतून लिहिल्याने त्याच्या मातृभाषेच्या प्रेमाचे कौतुक करण्यात आले.या दौऱ्यामध्ये मेघन याने अनेक कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला तसेच तेथे त्याने मिनाकारी कला या विषयावर विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेत प्रशिक्षक व व्याख्याता म्हणून काम केले. मेघन साळगावकरच्या या यशस्वी वाटचालीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)
साळगावकरची कलाकृती प्रथम
By admin | Published: November 05, 2015 9:54 PM