कणकवली : शहरात एस. एम. हायस्कूलसमोरील बॉक्सवेलची भिंत धोकादायक बनली आहे. शहरातील नाल्याची कामे अर्धवट असल्याने पाणी तुंबण्याची शक्यता आहे. शहरातील पदपथ बंद आहेत. सर्व्हिस रस्त्यावर पाणी साचत आहे. अशा अनेक समस्या नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांसमोर रविवारी मांडल्या.
यावेळी अधिकाऱ्यांनी येत्या ८ दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ही कामे वेळेत पूर्ण न झाल्यास व जनतेच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास नगरसेवकांना घेऊन रस्त्यावर उतरू. आता गप्प बसणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला.नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात महामार्ग ठेकेदार दिलीप बिल्डकॉन यांचे अधिकारी उदयसिंह चौधरी, परिहार यांच्यासमवेत आढावा बैठक रविवारी झाली. यावेळी नगरपंचायतीचे गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अॅड. विराज भोसले, माजी नगरसेवक अजय गांगण, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई, राजन परब, राजू गवाणकर, दत्ता शंकरदास आदी नागरिक उपस्थित आहे.यावेळी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. प्रांताधिकारी कार्यालयापासून जवळच रेवडेकर बिल्डींगच्या समोर नाला आहे. तिथे काम अपूर्ण आहे. त्याठिकाणी कठडा बनविलेला नाही. या सर्व कामांची आपण संयुक्त पाहणी करूया, असे नगराध्यक्षांनी सांगितले.कामे वेळेत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनकणकवलीलगतच्या दोन्ही नद्यांच्या पुलांच्यामध्ये चौपदरीकरण कामाची अवस्था बिकट आहे. अनेक ठिकाणी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या केव्हा सोडविणार ? शहरातील नाल्यांच्या ठिकाणी छोट्या मोऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील अनेक घरात व दुकानांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न समीर नलावडे यांनी विचारला.जानवली नदीवरील पुलाचा स्लॅब केव्हा घातला ? अशी विचारणा नलावडे यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यावर ४ जून रोजी स्लॅब घातला असून त्या पुलाचे काम व्यवस्थित करू, असे दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.येत्या ८ दिवसांत अन्य कामे करतो. तर छोटी कामे दोन दिवसांत होतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कामे वेळेत न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.