सावंतवाडी : काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या जागी प्रभारी जिल्हाअध्यक्ष म्हणून इर्शाद शेख यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी त्यांना तडकाफडकी हटवून प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काँग्रेसचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांच्याकडे दिली आहे. यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.सहा वर्षापूर्वी काँग्रेस मधून सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाहेर पडत वेगळा पक्ष काढला होता. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसची धुरा वरिष्ठ नेत्यांनी विकास सावंत याच्यावर दिली होती. मात्र त्यांनी मधल्या काळात आपल्याला कौटुंबिक कारणातून पक्षाला वेळ देता येत नाही असे सांगून जिल्हाध्यक्ष पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर या पदाची धुरा माजी सभापती चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे याच्याकडे देण्यात आली होती. पण त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन थेट ठाकरेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.त्यानंतर या पदाची जबाबदारी काँग्रेसचे तत्कालीन उपाध्यक्ष ईशाद शेख याच्याकडे दिली होती.मात्र मागील दिड वर्षापासून जिल्ह्यात काँग्रेस च्या कामाला वेग येत नव्हता. तसेच काँग्रेस चे कामच ही ठप्प झाले होते.अशातच मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस च्या प्रभारी जिल्हाध्यक्षांना हटवून त्या जागी प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून समीर वंजारी यांची नेमणूक केली आहे. या निवडीने अनेकांना धक्का बसला आहे.समीर वंजारी हे उच्च शिक्षित असून ते सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांना पदोन्नती देत थेट प्रभारी पद दिल्याने जिल्हा काँग्रेस अर्तगत कुरबुरी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे समीर वंजारी याच्या पत्नी साक्षी वंजारी या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहेत.
सिंधुदुर्ग काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षांना तडकाफडकी हटवले, समीर वंजारींकडे दिली नवी जबाबदारी
By अनंत खं.जाधव | Published: September 26, 2023 6:05 PM