दोडामार्ग : गाळ काढण्याच्या नावावर शिरवल धरणातूनवाळू काढण्याचा प्रकार ठेकेदाराकडून सुरू आहे. तो तात्काळ थांबविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी त्या ठिकाणी पाहणी केली असून या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.
शिरवल धरणातील गाळ काढण्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र गाळ उपसा करण्याच्या नावावर संबंधित ठेकेदार हा वाळू उपसा करत आहे. त्याने गाळ काढल्यानंतर तो गाळ शेतकऱ्यांना द्यावा, त्या बदल्यात शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये मिळणार होते. परंतु संबंधित ठेकेदारांनी आपल्याकडे कोणी शेतकरी आला नसल्याचे सांगून त्या ठिकाणी कोणालाही याचा लाभ दिला नाही. याबाबतची तक्रार ग्रामपंचायत सदस्य रोहन देसाई, विलास सावंत, सूर्यकांत नांगरे आदी ग्रामस्थांनी घारे यांच्याकडे केली होती.
या पार्श्वभूमीवर त्यांनी त्या ठिकाणी भेट घेतली असून याकडे तत्काळ लक्ष घालून बिनदिक्कत सुरू असलेला हा प्रकार रोखण्यात यावा, अशी मागणी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे केली असल्याचे सांगितले.