कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोरोनाबाबतची आजची स्थिती अतिशय गंभीर असून कोरोना आटोक्यात येत नाही. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढतच असून अनेक रुग्णांना अडमिट करायला बेडच शिल्लक राहिलेले नाहीत. अपुऱ्या बेडच्या कमतरतेमुळे रुग्ण दगावत असून बरीच जीवितहानी होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता जिल्ह्यात मुंबईच्या धर्तीवर १००० बेडचे जंबो कोविड सेंटर उभारले जावे, अशी मागणी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.संदेश पारकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड रुग्णांची आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता जिल्हा रेड झोन मध्ये जावून पोहोचला आहे. अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे रुग्ण दगावत आहेत. म्हणून जिल्ह्यात मुंबईच्या धर्तीवर १००० बेडचे जंबो कोविड सेंटर उभारले जावे. यात ८०० ऑक्सिजन बेड व २०० व्हेंटिलेटर बेड देणे गरजेचे आहे. तसेच यासाठी लागणारे डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी व यंत्रसामग्री मिळणे गरजेचे आहे.सध्याची दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णसंख्या बघता प्रत्येक तालुक्यात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड सह १००० बेड उपलब्ध असणारे सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभारणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचा तुडवडा जाणवत असून प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांट तयार करणे आवश्यक आहे.
ऑक्सिजन कॉंन्सन्ट्रेटर, जंबो सिलिंडर, डुरा सिलिंडर, आयसीयु बेड याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. तसेच जिल्ह्यात २ कार्डियाक व ५० अद्ययावत अशा अँब्युलन्स तसेच २ शववाहिन्या मिळणे गरजेचे आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे दहन करण्यासाठी जिल्ह्यातील नगरपंचायत व नगरपरिषद क्षेत्रांत विद्युत शववाहिनी उपलब्ध होणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील कोरोना चाचणी करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. याचा विचार करता जिल्ह्यात लवकरात लवकर टेस्ट रिपोर्ट मिळण्यासाठी २ मोबाईल आरटीपीसीआर लॅब, डॉक्टर्स, टेक्निशियन व स्टाफ मिळणे आवश्यक आहे. तसेच कोरोना सोबत नव्या उद्भवलेल्या म्युकरमायकोसिस आजारासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व औषधांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करून देणे गरजेचे आहे.जिल्ह्यात फिजिशियन्स, भूलतज्ज्ञांची कमतरता असून ते तातडीने उपलब्ध होण्यासोबत पॅरामेडीकल स्टाफ तसेच होमीओपॅथीच्या डॉक्टरांना नियुक्तीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावेत. जिल्ह्यात तातडीने कोरोना प्रतिबंधक लसीचा मुबलक पुरवठा व्हावा. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर टेस्टींग, ट्रेसिंग, कंटेनमेंट झोन याबाबत कडक अंमलबजावणी होण्याचे निर्देश द्यावेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीपासून ते सीसीसी सेंटर, रुग्णालये आदी ठिकाणी डाटा अपडेटसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयापासून सर्व कोविड हॉस्पिटलच्या ठिकाणी उपलब्ध बेड व रुग्णांची परिस्थिती माहितीसाठी नियंत्रण कक्ष उभारावा. तसेच जिल्ह्याच्या सिमेवर तपासणीसोबतच गावनिहाय सर्व्हे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावेत, असेही या निवेदनात म्हटले आहे.