रत्नागिरी : शहरातील पांढरा समुद्र किनाऱ्यावर प्रचंड प्रमाणात झालेल्या बेकायदा वाळू उपसाप्रकरणी ‘लोकमत’ने छायाचित्रासह वृत्त प्रसिध्द केल्यानंतर वाळू माफीया व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या चार वर्षांपासून किनारपट्टी उखडून टाकण्याच्या सुरू असलेल्या या षडयंत्रात सहभागी असलेल्या सर्वांचाच तपास होण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी रत्नागिरीकरांतून होत आहे.रत्नागिरीतील पांढरा समुद्र येथील किनारा नेमका कोठे आहे, हे शोधावा लागण्याची स्थिती आहे. संपूर्ण किनाराच खड्डयात गेला आहे. वाळू माफीयांनी येथील पांढरी वाळू उपसा करून आपले उखळ पांढरे करून घेतले आहेच, परंतु या प्रकरणात मोठे आर्थिक व्यवहार झाले असल्याचीही जोरदार चर्चा आहे. हे व्यवहार कोणाशी झाले याबाबतही ही चर्चा रंगली आहे. पांढरा समुद्र येथील बेकायदा वाळू उपसाप्रकरण हे आज कालचे नसून तब्बल चार वर्षांपासून हा उपसा सुरू आहे. त्यामुळे हा किनारा आता असुरक्षित बनला आहे. या ठिकाणच्या वाळू उपसावर पोट भरणारे काही वाहनचालक आहेत. काहींनी या चोरट्या वाळूतील फायद्यातून वाहनेही घेतली आहेत. याबाबतची तपशीलवार माहिती ‘लोकमत’ने प्रसिध्द केल्यानंतर महसूल यंत्रणेच्या कार्यपध्दतीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पांढरा समुद्र येथे वाळूच्या ढिगाऱ्याजवळ उभा असलेला तो जेसीबी कोणाचा होता? त्याबाबत महसूल खात्याने काही माहिती घेऊन कारवाई केली आहे काय? जी वाहने पांढऱ्या समुद्रावर वाळूसाठी जात होती ती कोणाची होती, याची माहिती घेतली आहे काय? मिरकरवाड्यातील मुख्य रस्त्यापासून पांढरा समुद्र किनाऱ्यापर्यंत दगड-मातीचा रस्ता नेमका कोणी व कशासाठी बनवला? याची माहिती घेण्यात आली काय? जर हा रस्ता शासनाने उभारला असेल तर त्याची माहिती लोकांना आहे काय? शासनाने उभारलेला नसेल व हा रस्ता बेकायदा असेल व त्यावरून चोरलेली वाळू वाहनांतून नेली जात आहे, हे माहिती असताना हा रस्ता उखडून टाकण्याची काही व्यवस्था शासकीय स्तरावर केली गेली आहे काय? असे अनेक प्रश्न रत्नागिरीकरांसमोर उभे ठाकले आहेत. पांढरा समुद्र किनाऱ्याप्रमाणेच आरे-वारे, काळबादेवी, नेवरे, ढोकमळे यासारख्या भागातही सागरी किनाऱ्यावरील वाळूची चोरी होत आहे. त्यासाठी बैलगाड्यांचा वापर केला जात आहे. पांढरा समुद्र किनाऱ्यावरील वाळू चोरीचा विषय ‘लोकमत’मधून प्रसिध्द होताच अन्य भागातील वाळू माफीयाही धास्तावले आहेत. तरीही त्या भागात हे प्रकार सुरूच आहेत. (प्रतिनिधी) वाळूवरील रेघोट्या...बेकायदा वाळू उपसाप्रकरणी एक गुप्त फतवाही निघाल्याची चर्चा आहे. ‘काय ते करा, पण प्रसारमाध्यमांत काही येणार नाही याची काळजी घ्या’. या गुप्त सल्ल्याची अंमलबजावणी वाळू माफीयांनी केली. त्यासाठी काही जणांच्या गटाला हाताशी धरून सर्व काही नीट ‘सेट’ करण्यात आले. मात्र, याबाबतची माहिती बाहेर फुटली व चर्चेला उधाण आले. या वाळूवर ज्यांनी रेघोट्या मारल्या त्यांच्याबाबत चर्चाही जोरात सुरू झाली आहे.मिरकरवाड्यातील गाळाचा ढीगाराही पोखरलामिरकरवाडा बंदरातील गाळाची वाळू ड्रेझरने उपसा करून पांढरा समुद्र किनाऱ्यावरच टाकण्यात आली आहे. हा वाळूचा ढिगाराही अनेक ठिकाणी वाळू माफीयारुपी घुशींनी पोखरला आहे. बाहेरून दिसणारा ढिगारा आतून किती पोखरला गेला आहे, याची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी करावी व कर्मचाऱ्यांमार्फत मोजमाप घेऊन किती ब्रास वाळूची चोरी झाली, शासनाचे किती नुकसान झाले, याचा हिशेब मांडून या सर्व स्थितीला जबाबदार असणाऱ्यांकडून शासनाचे झालेले हे लाखो रुपयांचे नुकसान भरून घ्यावे. त्याशिवाय बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांना व त्यांना अभय देणाऱ्यांना चाप बसणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीबाबत जनतेत समाधान असून, त्यांच्याकडून या माफीयांवर काही कारवाई होईल, वाळू चोरीला आळा घालण्यासाठी उपाययोजना केली जाईल, अशी रत्नागिरीकरांना अपेक्षा आहे.
वाळूमाफीया अन् अधिकारीही धास्तावले
By admin | Published: March 15, 2015 11:43 PM