सावंतवाडी/कुडाळ : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली-घोलेवाडी येथे मंगळवारी दुपारी २५ एकरांमधील आंबा, काजू, बांबू बागायती जळून सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे व पिंगुळी या दोन गावात सोमवारी मध्यरात्री आगीचे भीषण तांडव निर्माण झाले. यामध्ये वाडीवरवडेतील एका घराला सोमवारी रात्री व पिंगुळीतील कौल कारखान्याच्या जळावू लाकडांना मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने मोठ्या शर्थीने या दोन्हीही ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी हानी टळली असली तरी या आगीने हजारो रूपयांचे नुकसान झाले.सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील वाडीवरवडे येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वडाच्या झाडाला आग लागली. वाढत्या तापमानामुळे लागलेली ही आग हळूहळू पसरत जवळच असलेल्या एका स्टॉलला व नंतर स्टॉलला लागून असलेल्या घराला लागली. आग लागल्याचे समजताच घरातील मंडळींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच एमआयडीसीच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. काही वेळातच एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणत मोठी हानी टाळली. मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पिंगुळी येथील कौल कारखान्याला लागूनच ठेवलेल्या जळावू लाकडाच्या भागातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांनी खातरजमा केली असता तेथील जळावू लाकडे पेटताना दिसून आली. त्याने तत्काळ एमआयडीसी अग्निशमन दलाला याची माहीती दिली. पण अग्नीशमन येईपर्यंत ही आग सर्व जळावू लाकडांपर्यंत पोहोचल्याने आगीने रौद्र्ररूप धारण केले होते. उन्हाच्या वाढता कडाक्याने वाळलेली लाकडे क्षणार्धात या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पण एका बंबाने ही आग आटोक्यात आली नाही, परिणामी या बंबाने तीन फेऱ्या मारल्या तर यावेळी पाणी टँकरही मागविण्यात आला. त्यामुळे आग आटोक्यात आली. दरम्यान, तीन जेसीबीच्या सहाय्याने आगीत बचावलेली जळावू लाकडे कंपनीपासून काही अंतरावर नेऊमोठी हानी टाळली. या दोन्हीही आगी कशामुळे लागल्या याचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शॉर्टसर्किटनेच ही आग लागल्याचा अंदाज स्थानिक व्यक्त करत होते. सावंतवाडी तालुक्यातील सांगेली-घोलेवाडी येथे मंगळवारी दुपारी २५ एकरमधील आंबा, काजू, बांबू आदी बागायती जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल झाले. दरम्यान, ही आग एका संशयित व्यक्तीकडून लावली असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगेली ग्रामस्थांनी सावंतवाडी पोलिसांत धाव घेत संबंधीत व्यक्तीवर करण्याची मागणी केली. (वार्ताहर)संशयिताकडून आगी लावण्याचे प्रकारसांगेली येथे पंधरा दिवसांपासून संंंबंधित संशयित व्यक्तीकडून बागायतींना आग लावण्याचा घृणास्पद प्रकार सुरू आहे. शिवाय त्या व्यक्तीमार्फत अनेकांना धमकी देण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या व्यक्तीने सांगेली येथील महादेव कदम यांचे जळावू लाकूड, बिदाजी चव्हाण, रामा राऊळ, सदानंद सांगेलकर यांच्या काजू बागेला, तर अशोक देसाई यांच्या भाताच्या उडवीला आग लावून मोठे नुकसान केले. अनेकांनी त्याला असे प्रकार करताना रंगेहात पकडले आहे. आज त्याने पुन्हा आग लावल्याने येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्याकडे कैफियत मांडली. याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर चौकशीअंती संबंधित व्यक्तीला अटक करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.अग्निशमनची दमछाककुडाळ तालुक्यातील या दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीमुळे अग्निशमन विभागाची मात्र चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली. वाडीवरवडेतील आग विझविल्यानंतर अग्निशमन दल असे स्थानापन्न होते तोच पिंगुळीतील आग विझविण्यासाठी पुन्हा त्यांना तीन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
सांगेली, पिंगुळीत अग्नितांडव
By admin | Published: April 25, 2017 10:52 PM