वैभववाडी : वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे संजय सखाराम चव्हाण तर उपनगराध्यक्षपदी संपदा शिवाजी राणे विराजमान झाले. युतीच्या दोन्ही उमेदवारांना त्यांनी ९ विरुद्ध ७ असे पराभूत केले. निवडणूक निर्णय अधिकारी निशा शिंदे-सावंत यांनी निवड जाहीर केल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे संजय चव्हाण व युतीतर्फे भाजपच्या सुचित्रा कदम यांनी उमेदवारी दाखल केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे-सावंत यांनी नगराध्यक्ष पदासाठी हात उंचावून मतदान घेतले. चव्हाण यांना ९ तर कदम यांच्याबाजूने ७ नगरसेवकांनी मतदान केले. युतीच्या गटनेत्या व भाजपच्या नगरसेविका सरिता रावराणे कौटुंबिक अडचणीमुळे निवडणूक प्रक्रियेवेळी अनुपस्थित होत्या. नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या संपदा राणे व युतीतर्फे भाजपच्या सुप्रिया तांबे यांनी उमेदवारी दाखल केली होती. पावणे दोनच्या सुमारास उपनगराध्यक्ष पदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यामध्ये संपदा राणे ९ तर तांबे यांच्याबाजूने ७ नगरसेवकांनी मतदान केले. त्यामुळे युतीचे दोन्ही उमेदवार ९ विरुद्ध ७ अशा फरकाने पराभूत झाले.निवडणूक प्रक्रियेवेळी तहसीलदार संतोष जाधव, मुख्याधिकारी सचिन बोरसे उपस्थित होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बोरसे यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चव्हाण, राणे यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिलीप रावराणे, पंचायत समिती सभापती शुभांगी पवार, उपसभापती बंड्या मांजरेकर, मावळते नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, शहराध्यक्ष संजय सावंत, नासीर काझी, शिवाजी राणे, विषय समिती सभापती दीपा गजोबार, स्वप्नील इस्वलकर, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष प्राची तावडे सर्व नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)तांबे : ..तर काँग्रेसलाच मतदान केले असतेयुतीच्या गटाचे सदस्य असलेले रवींद्र तांबे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे त्यांना युतीच्याच उमेदवारांना मतदान करावे लागले. याबाबत त्यांना विचारले असता आपण गटातून बाहेर पडण्यासाठी प्रस्ताव दिला होता. मात्र, तशी परवानगी दिलेली नाही. विशेष म्हणजे आजच्या निवड प्रक्रियेसंबंधी गटनेत्यांचा 'व्हिप'सुध्दा मला नाही. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जर आमदार नीतेश राणे यांच्या उमेदवारांना दगाफटका झाला असता तर निश्चितच आपण राणेंच्याच उमेदवाराला मतदान केले असते', असे मत रवींद्र तांबे यांनी व्यक्त केले.
नगराध्यक्षपदी संजय चव्हाण
By admin | Published: January 13, 2017 10:38 PM