सावंतवाडी : निवडणूक काळात राणे जेवढे सावंतवाडीत येतात तेवढी त्यांची मते कमी होतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. भाजपचे उमेदवार संजू परब हे राणेंचेच छोटे रूप आहे. त्यामुळे येथील जनता त्यांना मतपेटीतून योग्य तो धडा शिकविल, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजू परब यांनी निवडणुकीच्या पूर्वी दोन महिने मडुरा येथील मतदार यादीतील नाव काढून सावंतवाडीतील मतदार यादीत घातले. त्यामुळे परब हे सावंतवाडीचे नागरिक कसे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी शिवसेना उमेदवार बाबू कुडतरकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वसंत केसरकर आदी उपस्थित होते.केसरकर म्हणाले, महाविकास आघाडी होणारच आहे. आमच्या चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्रातील तीनही पक्षाचे नेते एकत्र बसून योग्य तो निर्णय घेतील यात शंका नाही. ही जागा शिवसेनेला सुटली आहे. त्यामुळे शिवसेना प्रचार करीत आहे. कुडतरकर यांना चांगले यश मिळेल. कारण विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला या मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाले आहे. हेच मताधिक्य नगरपालिका निवडणुकीत दिसेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
राणेंना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही जेवढ्या वेळा सावंतवाडीत याल तेवढी तुमच्या उमेदवारांची मते कमी होतात. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. मी विकासाच्या फाईल नेहमी उघडत असतो. त्यामुळेच सावंतवाडीला २८९ कोटींचा निधी दिला आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.संजू परब हे मडुऱ्याचे मतदार होते. त्यांना तेथून जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक लढवायची होती. पण त्याना ते शक्य झाले नसल्यानेच त्यांनी दोन महिन्यांपूर्वी तेथील नाव काढून सावंतवाडी शहरातील मतदार यादीत घातले आहे, असा आरोपही केसरकर यांनी केला. तसेच मडुरा येथे रेल्वे टर्मिनस व्हावे अशी मागणी करणारे परब हेच होते. मग त्यांना सावंतवाडीबद्दल प्रेम कसे असणार? असा सवालही त्यांनी केला आहे.परब हे राणेंचे छोटे रूप आहे. त्यामुळे येथील जनता मतपेटीतून योग्य उत्तर देईल. मला विधानसभा निवडणुकीत जेवढे मताधिक्य मिळाले त्यापेक्षा अधिक मताधिक्य कुडतरकर यांना मिळेल, असा आशावादही यावेळी त्यांनी व्यक्त केला.सावंतवाडीत अद्ययावत मल्टिप्लेक्स उभारणार!यावेळी आमदार नीतेश राणे यांच्या टीकेला केसरकर यांनी प्रत्युतर दिले. ते म्हणाले, येथील जनता संस्थानिक आहे. त्यांना कंटेनर चित्रपट बघायची गरज भासणार नाही. आम्ही लवकरच अद्ययावत मल्टीप्लेक्स उभे करीत असून त्यात मॉल तसेच अन्य सोयीसुविधा देणार आहे. या जागेचा आराखडा तयार झाला असून, आता अंतिम स्थितीत आहे. याची नोंद राणे यांनी घ्यावी. त्यामुळे येथील जनतेला खोटे काहीतरी सांगून भूलभुलैया करणे एवढे सोपे नाही.