कणकवली : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्लाप्रकरणी दोन दिवस पोलिस कोठडीत असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना आज ( बुधवारी) कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सावंत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने ॲड. प्रदीप घरत यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, ती मागणी फेटाळत न्यायालयाने संदेश उर्फ गोट्या सावंत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता गोट्या सावंत यांना जामीनाकरीता सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करावा लागणार आहे. गोट्या सावंत यांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे यांनी काम पाहिले.दरम्यान, पोलिस कोठडीत असताना सावंत यांचा मोबाईल कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतला होता. काल त्यांना कोठडीतून कणकवली पोलीस ठाण्यात आणत दिवसभर चौकशी करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाडे व पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी चौकशी केली.