कणकवली : कणकवली तालुक्यातील बिनविरोध निवड झालेल्या भाजपच्या ७ सरपंचांचा आमदार नितेश राणे यांनी ओम गणेश निवासस्थानी सत्कार करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. या निवडीमुळे आता तुमची जबाबदारी वाढली असून, यापुढे अजून जोरात काम करा. तुमच्याकडून गावाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. असे प्रतिपादन आमदार राणे यांनी यावेळी केले. तसेच तालुक्यात भाजपचे १०० ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीत भाजपचा विजयी होईल असा विश्वास देखील व्यक्त केला. गेल्या साडेपाच महिन्यांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांनी एकत्रितरित्या केलेल्या कामामुळे लोकांचा आमच्यावर आता विश्वास वाढला आहे. जनतेला विकास हवा आहे. गावचा विकास करायचा असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही हे या सातही ग्रामपंचायतमध्ये लोकांनी ठरवल्यामुळेच या निवडी बिनविरोध झाल्याचे ते म्हणाले. बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीधर्म पाळत एकत्रित निवडणुका लढवत आहे. कणकवलीत विरोधकांना एक आकड्याच्या आसपासच राहावे लागेल अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, वारगाव सरपंच नम्रता शेट्ये, सुरेश साटम (साकेडी), रवींद्र शेट्ये (शीडवणे), प्राजक्ता मुद्राळे (पिसेकामते), समृद्धी नर (करूळ) यांच्यासह या बिनविरोध झालेले सदस्य यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेला विकास हवा असल्यानेच सरपंच निवडी बिनविरोध - नितेश राणे
By सुधीर राणे | Published: December 08, 2022 5:03 PM