कणकवली : कामातील अनियमितेबाबत ग्रामस्थांनी केलेली तक्रार याची पडताळणी करून भिरवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती सुजाता संतोष सावंत यांना सरपंच पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५१ मुंबई अधिनियम ३९(१) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सुजाता सावंत, यांना त्यांच्या सरपंच पदावरून काढून टाकण्यात येत आहे. असे आदेश विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे शिवसेनाउद्धव ठाकरे गटाला धक्का तालुक्यात बसला आहे.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत, यांच्या एका तक्रारी अर्जावरून पंचायत समिती कणकवलीचे गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना अहवाल सादर केला. सदर अहवालाच्या अनुषंगाने, सरपंच सुजाता सावंत यांनी भिरवंडे ग्रामपंचायतीच्या कामात हलगर्जीपणा व अनियमितता केल्याचे दिसून आले. त्यानुसार सरपंच सावंत यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार कारवाई करणेबाबत प्रस्तावित केले होते.सदर प्रकरणी अधिनियमातील तरतुदीनुसार रितसर चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना आयुक्तांनी आदेश केले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी अहवाल दिला. या संपूर्ण अहवालाचा अभ्यास करून सरपंच सुजाता सावंत यांना आपले म्हणणे मांडण्याची आयुक्तानी संधी दिली. मात्र मूळ तक्रारीनुसार त्या दोषी ठरल्याने त्यांना सरपंच पदावरून काढून टाकण्यात येत असल्याचे आदेश कोकण आयुक्तांनी दिले आहेत.
सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे गटाला धक्का, भिरवंडेच्या सरपंच सुजाता सावंत बडतर्फ
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 26, 2022 3:35 PM