दोडामार्ग : वीज वितरणाच्या सासोली उपकेंद्रातील गोडावूनला आग लागल्याने लाखो रुपयांची हानी झाली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत जुने वीज मीटर व इतर साहित्य जळून खाक झाले.
सासोली येथे वीज वितरणाचे उपकेंद्र आहे. येथूनच महालक्ष्मी विद्युत प्रा. लि. कडून मिळणारी व इन्सुली येथून येणारी ३३ केव्ही लाईनची वीज तालुक्याला दिली जाते. या उपकेंद्राच्या बाजूलाच गोडावून आहे त्या गोडावूनमध्ये जुने वीज मीटर, इतर साहित्य तसेच नव्याने आलेले इन्सुलेटर ठेवण्यात आले होते. त्या गोडावूनलाच आग लागली. ३३ केव्ही विद्युत वाहिनी शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आजूबाजूला असलेल्या गवताला आग लागून ती गोडावूनमध्ये शिरली, असे ग्रामस्थांनी सांगितले. आगीचे धुराचे लोट दिसताच सासोली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र अग्निशामक यंत्रणा उपलब्ध नसल्याने गोडाऊन जळून खाक झाले.