कणकवली : संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांची सशर्त जामिनावर सुटका झाली आहे. अजून त्या दाव्याचा निकाल लागलेला नाही. मात्र, अशा परिस्थितीमध्ये त्यांचा कार्यकर्त्यांकडून स्वागताचा जो कार्यक्रम सुरू आहे तो सुसंस्कार संपत चालल्याचा एक भाग आहे. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवत इतर मुद्यावरून राजकारण करायचे असे सत्र नितेश राणे यांनी सुरू केले आहे. अशी टीका सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केली आहे.
नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर ते आजारी पडले. केवळ न्यायालयीन कोठडीत न जाण्यासाठीच त्यांचे दुखणे होते असी जळजळीत टीकाही त्यांनी यावेळी नितेश राणे यांच्यावर केली.कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, सचिन सावंत, संतोष परब, रूपेश आमडोसकर व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय दृष्ट्या नेहमीच वैशिष्टपूर्ण राहिला आहे. पण अप्पासाहेब पटवर्धन यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तींच्या पदस्पर्शाने संस्कारित झालेल्या भूमीत घडत असलेल्या आताच्या राजकीय घटना पाहता समाजाच्या मानसिकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. खर तर जिल्ह्यातील सुसंस्कारित जनतेने आता जागे व्हायलाच हवे. नाहीतर येथील आप्पासाहेब पटवर्धन, बॅ. नाथ पै , मधु दंडवते यांचे आदर्श नव्या पिढीला समजणार नाहीत.
न्याय देवते समोर सगळे समान आहेत हे दिसून आलेले आहे. नितेश राणेंचा घडलेल्या चुकीच्या घटनेशी काहीही संबंध नसेल तर त्यांनी घाबरायचे काहीच कारण नाही. पण सिंधुदुर्गातील जनता सुज्ञ आहे. ती योग्य वेळी न्याय केल्याशिवाय राहणार नाही. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. खून, मारामारी दहशतीने नाही.
नारायण राणे यांना फक्त आपल्या कुटुंबाची काळजी आहे. ते या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांच्या तब्बेतीची साधी चौकशी करण्याचे सौजन्य राणे यांनी दाखवले नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री असूनही जिल्ह्यातील जनतेची त्यांना काळजी नाही हे दिसून आले. ते लोकसेवक असते तर निश्चितपणे संतोष परब यांची विचारपूस करण्यासाठी गेले असते.
तसेच निदान या घटनेने तरी नितेश राणे सुधारतील असे आम्हाला वाटले होते. परंतु त्यांच्यात कोणतीच सुधारणा झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे . त्यामुळे नितेश राणे यांनी तोंड उघडावेच. मग त्यानंतर त्यांना समजेल कुणाचा बीपी वाढतो ते असेही सतीश सावंत यावेळी म्हणाले.