सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १३व्या अध्यक्षपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुरेश दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यावेळी प्रथमच काँग्रेस व राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने एकत्र येत सहकार संकल्पसिद्धी पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविली; तर शिवसेना-भाजप पुरस्कृत सहकार वैभव पॅनेलने सहकार क्षेत्रात प्रथमच प्रवेश केला. या निवडणुकीत सहकार संकल्पसिद्धी पॅनेलने बँकेच्या १९ संचालक पदांपैकी तब्बल १५ जागांवर विजय मिळवत बहुमत सिद्ध केले, तर सहकार वैभव पॅनेलने चार जागा निवडून आणत सहकार क्षेत्रात प्रवेश केला.शुक्रवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बोंबले यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड झाली. ही निवड अतिशय शांततेत आणि बिनविरोध पार पडत अपेक्षेप्रमाणे अध्यक्षपद काँग्रेसकडे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यात आले आहे.अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, गेल्या सात वर्षांत संचालक मंडळाने चांगला कारभार करून बँकेचा उत्कर्ष आणि शेतकऱ्यांचे हित जपले, याचीच पोचपावती मतदारांनी आम्हाला दिली आहे. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. जिल्ह्यातील ऊस उत्पादन, दूध उत्पादन वाढविण्याच्यादृष्टीने योजना राबविल्या जातील, अशी प्रतिक्रिया सतीश सावंत यांनी यावेळी दिली.नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुरेश दळवी म्हणाले, या बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड सर्व संचालकांच्या सहकार्याने बिनविरोध झाली आहे. त्यामुळे येथे सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव केला जाणार नाही. बँकेचे हित आणि सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणाऱ्या योजना सर्वानुमते राबविल्या जातील. आतापर्यंत ज्याप्रमाणे जिल्हा बँकेने अभ्यासपूर्ण योजना राबविल्या, त्याचप्रमाणे यापुढेही नव्या योजना राबविताना सर्व संचालकांचे मत विचारात घेऊन त्यावर चर्चा करूनच राबविल्या जातील. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. मात्र, संचालक व्हिक्टर डान्टस यांची अनुपस्थिती जाणवत होती.‘लोकमत’चे वृत्त खरे ठरलेजिल्हा बँक अध्यक्षपदी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांचे नाव आघाडीवर असून, उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे व्हिक्टर डान्टस आणि सुरेश दळवी यांची नावे चर्चेत असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने १३ मे रोजी प्रसिद्ध केले होते. त्याप्रमाणे अध्यक्षपदी सावंत आणि उपाध्यक्षपदी दळवी यांची निवड झाल्याने त्या वृत्तावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. राजकारणविरहित सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या व बँकेच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार आहे. जुलैपासून शेतकऱ्यांसाठी ५० हजारापर्यंत कॅशलेस मेडिकल सुविधा व सुलभ कर्ज योजना राबविणार आहे. - सतीश सावंत, जिल्हा बँक अध्यक्षआम्ही पक्षीय राजकारणात जरी विरोधक असलो तरी जिल्हा बँकेच्या कारभारात विरोधासाठी विरोध करणार नाही. बँकेचे आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्षांना सहकार्यच राहणार आहे.- अतुल काळसेकर, विरोधी गटाचे संचालक
जिल्हा बँक अध्यक्षपदी सतीश सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2015 12:02 AM