कणकवली : गेल्या २४ वर्षात नारायण राणें सोबत प्रामाणिकपणे राहून निष्ठेने काम केले. २००९ पासून माज्या नावाची आमदारकीसाठी स्वत: राणेंनी चर्चा केली. मात्र नेहमी ही चर्चा अफवाच ठरली. गेल्या १५ दिवसात माज्या काही हितशत्रूनी राजकीय घडामोडींमध्ये नारायण राणे यांच्याकडे माज्याबद्दल गैरसमज पसरवून अविश्वास निर्माण करण्याचे काम केले. त्यामुळे नेतृत्वाचाच आता जर माज्यावर विश्वास नसेल तर त्या पक्षात राहण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या प्रवक्ते पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. असे सांगत नारायण राणे यांच्यावरील माज्या निष्ठेला आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अशी खंत नारायण राणे यांचे खंदे समर्थक सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे व्यक्त केली.
कणकवली तालुक्यातील कलमठ येथील आपल्या निवासस्थानी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांचे अनेक समर्थक त्या ठिकाणी उपस्थित होते.
सतीश सावंत म्हणाले, गेल्या दोन दिवसांपूर्वी राणेंचा निरोप असल्याचे सांगून आमदार नितेश राणे यांनी मला कुडाळमधून अपक्ष उमेदवारी भरण्यास सांगितले. एकीकडे आमदारकीची आश्वासने दिली जात असताना माझ्यासारख्या २४ वर्षे प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अपक्ष लढण्यास सांगण्याची गरज काय होती ? ही बाब मला मोठी वेदना देणारी होती. त्यातच नारायण राणे यांनी सोमवारी मला फोन करून माझ्यावर अविश्वास निर्माण झाल्याप्रमाणे अनेक प्रश्न विचारले. त्यामुळे माझ्या कुटुंब प्रमुखाचाच माझ्यावर विश्वास नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मी स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देऊन शेतकऱ्यांसाठी सहकाराच्या माध्यमातून काम करणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर मी पक्ष सोडत आहे असे काही नाही. जो पक्ष जनतेची कामे करतानाच माझ्या सोबत येणाºया कार्यकर्त्यांना मान सन्मान देईल. त्या पक्षात जाण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सतीश सावंत यांनी सांगितले.मी काँगेस जिल्हाध्यक्ष असताना किंवा त्यांनंतरच्या कालावधीतही कुठल्याही पक्षाच्या किंवा कणकवली विधानसभा मतदार संघातील निर्णय प्रक्रीयेत आमदार नितेश राणे यांनी मला सहभागी करून घेतले नाही. अशी अनेक कारणे मी पक्ष सोडण्यामागे आहेत. मी कुठल्याही कार्यकर्त्यांशी चर्चा न करता हा निर्णय घेतला आहे. ज्या कार्यकर्त्यांना माझे विचार पटतील ते माझ्या सोबत येतील. मी स्वाभिमान पक्ष फोडण्याचा प्रयत्न करणार नाही. येणाºया काळात जो पक्ष रोजगाराचा, शिक्षणाचा प्रश्न व कोकणातील प्रलंबीत प्रश्नांना न्याय देईल. अशा सत्तेतील पक्षात आम्ही जाण्याचा निर्णय घेऊ. दोन पाऊले मागे घेऊन मीच स्वत: पक्षा बाहेर पडलो आहे. या मुद्यावर कोणीही वैयक्तिक टिका करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तोडीस तोड उत्तर दिले जाईल. जिल्हा परिषदेतील २८ सदस्यांच्या गटाचा मी गटनेता आहे. तसेच मी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलो आहे. त्यामुळे येत्या काळात कायदेशीर बाबी तपासून त्या-त्या वेळी निर्णय घेण्यात येईल असेही सतीश सावंत यांनी स्पष्ट केले.अविश्वासामुळेच हा निर्णय !मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरेंना भेटून आलास का? खासदारांबरोबर भोजन कशाकरीता करता? असे प्रश्न अनेकदा राणेंकडून माज्यावर अविश्वास असल्याप्रमाणे विचारण्यात आले . त्यामुळे या पक्षात राहून सातत्याने अपमान होण्यापेक्षा स्वाभिमान पक्ष सोडण्याचा निर्णय मी घेतला आहे. असे सतीश सावंत यांनी यावेळी सांगितले.सतीश सावंतांच्या निवासस्थानी गर्दी !कलमठ येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेच्या वेळी कणकवली पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, स्वाभिमान पक्ष कळसुली विभाग अध्यक्ष अतुल दळवी, माजी पंचायत समिती सदस्य अजय सावंत, हरकुळ बुद्रुक माजी सरपंच आनंद ठाकूर, करंजे माजी सरपंच संतोष परब, नागवे माजी सरपंच सत्यवान उर्फ बाळा सावंत, आबा मुंज, अनिल खोचरे, दामू सावंत, संजय सावंत यांच्यासह अनेक समर्थक उपस्थित होते.कलमठ येथील निवासस्थानाबाहेर कणकवली सतीश सावंत समर्थकांनी गर्दी केली होती.