सावंतवाडीमध्ये महिलाभवन उभारणार बबन साळगावकर : नगरपालिकेच्यावतीने रोजगार मेळावा उत्साहात; घरघंटीसह शिलाई मशिनचे वाटपसावंतवाडी : महिलांना आवश्यक उद्योग पुरवून त्यांना सक्षम करण्यावर प्रशासनाचा भर असून त्यासाठी नगरपालिकेच्यावतीने सालईवाडा येथे महिलाभवन उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. महिला दिनानिमित्त येथील नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात महिला व बालकल्याण समिती तसेच दीनदयाळ योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी साळगावकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, युनियन बँकेचे अधिकारी विक्रमसिंह रोहिले, महिला बालकल्याण समिती सभापती अनारोजीन लोबो, समृद्धी विर्नोडकर, दीपाली भालेकर, भारती मोरे, माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आदी उपस्थित होते.नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले की, महिलांना सलाम करण्यासाठीच मी व्यासपीठावर उभा आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले याचे श्रेय शरद पवार यांना जाते. यशवंतराव चव्हाण, शरद पवार तसेच आर. आर. पाटील यांच्या मातांनाही आपला सलाम असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार म्हणाले, १९७५ पासून महिला दिन साजरा केला जात आहे. आज असे कोणतेच क्षेत्र नाही, की ज्या ठिकाणी स्त्रियांनी आपला ठसा उमटविला नाही. आपले घर सांभाळून महिलांनी केलेले काम विशेष कौतुकास्पद आहे. वात्सल्य, चिकाटी, सहनशीलता, अद्भुत साहस या गुणांमुळे महिला आज पुढे येत आहेत. आपण जेव्हा उपविभागीय अधिकारी झालो, तेव्हा आपल्या सोबत नऊ जण उपविभागीय अधिकारी झाले. यात पाच महिला होत्या. असे असले तरी आजही महिलांवर अन्याय-अत्याचार होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी महिलांनी आपले सामर्थ्य ओळखावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी विजयकुमार द्वासे यांनीही मनोगत व्यक्त केले. युनियन बँकेचे अधिकारी विक्रमसिंह रोहिले यांनी बँकेमार्फत महिलांसाठी योजनांची माहिती दिली. यावेळी आठ घरघंटी व आठ शिलाई मशिनचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला बालकल्याण विभागातून थेट निधी शिलाई मशिन व घरघंटी खरेदीला उपलब्ध झाला. त्यासाठी माजी महिला बालकल्याण सभापती साक्षी कुडतरकर, नगरसेविका कीर्ती बोंद्रे, अफरोज राजगुरु, शर्वरी धारगळकर, क्षिप्रा सावंत, शुभांगी सुकी, नगरपालिका कर्मचारी आसावरी शिरोडकर, प्रिया परब, परवीन शेख यांनी प्रयत्न केल्याचे साळगावकर यांनी सांगत त्यांचे आभार मानले. (वार्ताहर)स्वत: चा प्रश्न स्वत: सोडावा : अन्नपूर्णा कोरगावकरसावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी स्त्रीने संसारात वावरताना लढण्याची तयारी ठेवावी. सरकारच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेऊन महिलांनी स्वत:चा प्रश्न स्वत: सोडविण्याचा नेहमी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
सावंतवाडीमध्ये महिलाभवन उभारणार
By admin | Published: March 09, 2017 6:31 PM