सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवनवीन योजना आणल्या जात आहेत. पण, योजना पूर्ण करायला यांच्याकडे पैसे नसल्यानेच आता रिझर्व्ह बँकेकडे सव्वा लाख कोटींचे कर्ज मागितले आहे. त्यामुळेच निवडणुका लवकर लागल्या पाहिजेत; अन्यथा महाराष्ट्रावर नऊ लाख कोटींचे कर्ज होईल आणि ते आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार घालवा आणि सर्वसामान्यांचे सरकार आणा, असे आवाहन राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
शिवस्वराज्य यात्रेनिमित्त शनिवारी येथील गांधी चौकात जाहीर सभा पार पडली. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, हे इव्हेंट सरकार आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाहीत आणि लाडकी बहीण योजना आणली. बहीण सुरक्षित राहिली तरच योजना चालणार; पण सांगणार कोण? शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावरही त्यांनी टीका केली. दिवाळी आली तरी गणवेश नाही. यांना आता फक्त लाडका कॉन्ट्रॅक्टर हवा आहे; पण मुलांचे गणवेश नको.