रत्नागिरी : मांडवी ते राजीवडा किनाऱ्यावरील जनतेचे समुद्री अतिक्रमणापासून संरक्षण व्हावे, अशी मागणी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी निवेदनाव्दारे केली आहे.तेथील नागरिक सन १९८८पासून आज २६ वर्षे प्रयत्न करीत आहेत. संबंधीत बंधाऱ्याची निविदा मंजूर झाली. मांडवी येथील बंधारा झाल्यामुळे तेथील नागरिकांचे संरक्षण झाले. पण पुढे घुडेवठार, विलणकरवाडी येथील बंधारा अपूर्ण राहिल्याने समुद्राच्या पाण्याने त्या ठिकाणी अतिक्रमण करुन काठावरील नागरिकांची वित्तहानी झाली. याठिकाणी बंधारा दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.बंधाऱ्यासाठी पाच कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली असून, तीन कोटीचे बांधकाम टी. एस. पवार या ठेकेदारांनी केल्याचे मे. बंदर अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले. मात्र, संबंधित ठेकेदाराची कामाची रक्कम अदा न केल्याने पुढील बांधकाम थांबविण्यात आल्याचे सांगण्यात येते. हे काम या पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. त्याची प्रत बंदर अधिकारी, जिल्हाधिकारी रत्नागिरी, मेरी टाईम बोर्ड, आयुक्त, बंदर विकासमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना पाठविलेली आहे. पावसाळ्यापूर्वी घुडेवठार, विलणकरवाडी येथील बंधारा पूर्ण होणे आवश्यक आहे. तो न झाल्यास पावसाचे, समुद्राचे पाणी काठावरील नागरिकांच्या वस्तीत अतिक्रमण करुन वित्त व जीवितहानी होईल. समुद्राचे पाणी काठावरील नागरिकांच्या घरापर्यंत आलेले असल्याने नागरिकांनी गणपतीपुळे, रत्नागिरी येथे बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रिटचा बंधारा त्याप्रमाणे बंधाऱ्याचे बांधकाम व्हावे, अशी मागणी केली आहे. सिमेंट काँक्रीटचा बंधारा झाल्यास धोका टळेल, असे लोकाचे म्हणणे आहे. भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर, सुरेंद्र घुडे, राजेंद्र विलणकर, राजेंद्र घुडे, अशोक मयेकर, मधुकर नागवेकर, विजय भाटकर, सतीश हातखंबकर, शिवराम विलणकर, अनंत भाटकर यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)1सव्वीस वर्षांच्या प्रयत्नांनंतर मांडवी येथील बंधारा मंजूर झाल्यानंतरही पूर्ण होऊ शकला नाही. आता पालकमंत्री रवींद्र वायकर हे याबाबत हालचाली करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. 2घुडेवठार-विलणकरवाडी येथील बंधारा मात्र अद्याप अपूर्णच राहिल्याने समुद्री आक्रमणाचा धोका कायम असल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन जगत असल्याचे चित्र आहे.
मांडवी-राजिवडा किनारपट्टीला वाचवा
By admin | Published: January 19, 2015 11:15 PM