मालवण : स्वातंत्र्यपूर्व काळात सावित्रीबाई फुलेंसमोर मुलींच्या शिक्षणाचे असलेले आव्हान त्यांनी समर्थपणे स्वीकारल्याने आज समाजात सावित्रीच्या लेकी म्हणून आपण महिला मानाने जगत आहोत. सावित्रीबाई फुले हे संपूर्ण समाजासाठी आदर्शवत व्यक्तिमत्त्व होते. या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी केले.मालवण येथील भंडारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका सुप्रिया टिकम, शिक्षिका सुजाता यादव, अनुष्का कदम, अभिनेत्री सुजाता शेलटकर, कोरोना योद्धा स्नेहा हरमलकर, सविता पटकारे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी तेजस्विता करंगुटकर, मत्स्य व्यावसायिक आणि विद्यार्थिनी लिखिता मालंडकर आदी उपस्थित होत्या.पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिलांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेच्या विद्यार्थिनी पूर्वा परब, कृती गोसावी तसेच सत्कारमूर्ती सुजाता यादव, अनुष्का कदम, सुजाता शेलटकर, तेजस्विता करंगुटकर यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सुनंदा वराडकर यांनी केले तर आभार सरोज बांदेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक हणमंत तिवले, प्रफुल्ल देसाई, अरविंद जाधव व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.