लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांचा संभाव्य भाजप प्रवेश गृहीत धरून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी अखेर काँग्रेसने शनिवारी बरखास्त केली. कॉँग्रेसच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे प्रदेश सदस्य आणि निष्ठावंत विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी मुंबईत केली. उर्वरित कार्यकारिणीचे पुनर्गठण हे येत्या पंधरा दिवसांत करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. हा निर्णय म्हणजे राणे यांना जोरदार धक्का मानला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त होणार याची चर्चा गेले काही दिवस सर्वत्र होती. आठवड्यापूर्वी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसचे नेते जिल्ह्यात त्यावेळी सावंतवाडीत बैठक झाली. या बैठकीत आमदार नीतेश राणे यांनी प्रदेशच्या नेत्यांना चांगलेच धारेवर धरले होते. तसेच ही बैठक ‘हायजॅक’ही केली होती.
याबाबतचा अहवाल खासदार दलवाई यांनी प्रदेश काँग्रेसला पाठविला होता. याबाबत शनिवारी प्रदेश काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सिंधुदुर्ग काँग्रेस अध्यक्षाविना राहू नये यासाठी तातडीने जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांची नेमणूक करण्यात आली. असेही प्रदेश काँग्रेसचे सचिव गणेश पाटील यांनी सांगितले.बरखास्तीमागे दलवाई व प्रदेशच्या नेत्यांचे षड्यंत्र : सतीश सावंतसिंधुदुर्गात काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यामागे खासदार हुसेन दलवाई व प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांचे षड्यंत्र आहे. आमच्याकडे बरखास्तीबाबत अधिकृत कोणतेही पत्र आले नाही. अधिकृत पत्र मिळाल्यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ. असे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.प्रदेश कॉँग्रेसकडून दखलसिंधुदुर्ग काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा घेतलेला निर्णय हा काँग्रेस नेते नारायण राणे यांना जोरदार धक्का मानला जात आहे. कारण राणे यांच्या भाजप प्रवेशापूर्वी काँग्रेसच्यावतीने उचललेले हे पाऊल असून, सिंधुदुर्गात राणे समर्थकांनी राणे यांनाच मानणाºयांना सरपंचपदाची उमेदवारी दिली जाईल, असे जाहीर केले होते. तसेच गणेश चतुर्थीच्या काळात जिल्ह्यात लावण्यात आलेल्या बॅनरवरून काँग्रेसच्या हाताचे चिन्ह गायब झाले होते. तसेच एकाही नेत्याचा फोटो नव्हता. या सर्व तक्रारी प्रदेश काँग्रेसकडे गेल्या होत्या. याची गंभीर दखलही प्रदेश काँग्रेसच्यावतीने घेण्यात आली आहे. या सर्व तक्रारीनंतर अखेर शनिवारी हा निर्णय घेण्यात आलाआहे.
सिंधुदुर्गात काँग्रेसने माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे, त्या जबाबदारीला अनुसरून काम करेल. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, तसेच उपाध्यक्ष राहुल गांधी, प्र्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार हुसेन दलवाई यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो सार्थकी लावेन.- विकास सावंत, नूतन जिल्हाध्यक्ष
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. तसेच विकास सावंत यांची नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूकही करण्यात आली आहे. आम्हाला सावंतवाडीतील बैठकीचा अहवाल प्राप्त झाला होता.-अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष
जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. यामागे राणे यांच्या भाजप प्रवेशाचे कारण नाही. सहा हजार सभासद नोंदणीसाठी पुस्तके पाठवूनही ती वितरित केली नसून एकही सभासद न केल्याने काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.- अॅड गणेश पाटील, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस.