कणकवली : मी पक्षविरोधी कोणतेही काम केलेले नाही. मी राज्यस्तरावरील नेता आहे. कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांना मला नोटीस बजावण्याचा कोणताही अधिकार नाही. सुरुवातीपासूनच पक्षातून काढण्याची घाई असलेल्यांपैकी सावंत एक आहेत, अशी खरमरीत टीका संदेश पारकर यांनी केली. पक्षविरोधी कामामुळे कारवाईची नोटीस बजावण्यात आल्यानंतर पारकर यांनी शनिवारी येथील पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, अवधूत मालणकर उपस्थित होते. पारकर म्हणाले की, कॉँग्रेस प्रवेशावेळीच पक्षातील काही पदाधिकारी मला बाहेर काढण्यासाठी उतावीळ होते. नोटीस मला मिळण्याआधीच ही माहिती प्रसिद्धीस देणाऱ्यांत हेच नेते उतावीळ होते. मी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. जर मी पक्षविरोधी काम केले असेल तर त्या पातळीवरील पदाधिकारीच मला जाब विचारतील. जिल्हाध्यक्ष माझ्यावर कारवाई करू शकत नाहीत. सतीश सावंत यांनी स्वत:ची मर्यादा ओळखावी. कॉँग्रेस अजून सावंत यांना कळलेली नाही. कॉँग्रेस कोणाची खासगी मालमत्ता नाही. मी पक्षप्रवेश केल्यानंतर मालवण नगरपरिषद, वेंगुर्ले नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायतीवर कॉँग्रेसची सत्ता आली. तसेच देवगड विधानसभा गेली कित्येक वर्षे भाजपकडे होती. त्या मतदारसंघात कॉँग्रेसचे नीतेश राणे विजयी झाले. या विजयात आमचा वाटा आहे. उलट सतीश सावंत जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मालवण आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसचा पराभव झाला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आदी वरिष्ठ नेत्यांशी सातत्याने माझा संपर्क असून, मी कॉँग्रेसमध्ये कार्यरत रहावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांना मी पक्षात राहिल्यास त्यांची पदे हिरावली जातील, अशी भीती वाटत असल्याने मला पक्षातून काढण्याची त्यांना घाई झाली आहे. कणकवली नगराध्यक्ष निवडीसंदर्भात माझी वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा सुरू होती; मात्र मी सुचविलेल्या नावांना बगल देत दुसऱ्यांनाच उमेदवारी देण्यात आली. मात्र, जनहिताचा विचार करून आम्ही कॉँग्रेसचेच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बसविले. यात आम्ही कोणतेही पक्षविरोधी काम केलेले नाही. दोडामार्ग आणि वैभववाडीत युती आणि अन्य उमेदवार फोडून नगराध्यक्ष बसविणे हे चुकीचे नाही का? असा प्रश्न पारकर यांनी केला. (प्रतिनिधी) विजय सावंत यांच्यावर कारवाई नाही विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदार विजय सावंत यांच्याविरोधात अद्याप पक्षाने कारवाई का केलेली नाही? असा प्रश्न करीत सतीश सावंत यांना कॉँग्रेस कळलेली नाही, असे पारकर म्हणाले.
नोटीस बजावण्याचा सावंतांना अधिकार नाही
By admin | Published: December 05, 2015 11:26 PM