सावंतवाडी , दि. १९ : दिवाळी सणानिमित्त येथील बाजारपेठ गजबजून गेली असून खरेदीसाठी मोठी गर्दी उसळत आहे. मात्र, सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने सर्वजण आवश्यकतेनुसारच खरेदी करताना पहायला मिळत आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्याची दिवाळी मात्र यावर्षी शेतीतच जाणार आहे.
हिंदू धर्मात दिवाळी सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळी सण म्हटला की लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज आदी कार्यक्रम येत असल्याने घरात आंनदाचे वातावरण असते.
दरम्यान, यावर्षी महागाईने डोकेवर काढल्याने त्याचा परिणाम दिवाळी सणावर दिसून येत आहे. लक्ष्मी पूजनाची तयारी दुकानदार वर्गाकडून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दुकानदार आपल्या दुकानाची साफसफाई करताना दिसून येत आहेत.
लक्ष्मी पूजनासाठी व दुकानाला हार लावण्यासाठी आवश्यक असलेली झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाली आहेत. यावर्षी दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, शंभर रूपये किलोच्या भावाने ती विकली जात आहेत. शहरात ठिकठिकाणी झेंडूची फुले विक्रीसाठी दिसून येत आहे. त्याला ग्राहकांचीही मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची दिवाळी मात्र यावर्षी शेतातच जाणार आहे. पाऊस लांबल्याने भातशेती कापणी खोळंबली आहे. त्यामुळे भातकापणीच्या मागे शेतकरी असून दिवाळी सण शेतातच जाणार आहे.