सावंतवाडी : माझ्या संपूर्ण भारत भ्रमंतीत नैनिताल आणि चंदीगडपेक्षाही सावंतवाडी शहर सुंदर व स्वच्छ वाटले. ही सुंदरता अशीच कायम ठेवा, असे आवाहन गोसेवा सद्भावनेनिमित्त पदयात्रा करीत सावंतवाडीत आलेल्या मोहम्मद अजीज खान यांनी केले.राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लीम संस्थेच्यावतीने खान यांनी १२ हजार किलोमीटरचा देश पायी जाण्याचा संकल्प सोडला आहे. आतापर्यंत त्यांनी साडेदहा हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. लेहपासून कन्याकुमारी आणि आता कन्याकुमारीपासून अमृतसर असा प्रवास करत आहेत. ते सावंतवाडी शहरात दाखल झाले. यावेळी त्यांचा सावंतवाडी नगरपालिका व वेदशाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मी आतापर्यंत २१ महिन्यात अनेक गावे, शहरे फिरलो. मात्र, सावंतवाडीसारखे सुंदर आणि स्वच्छ शहर कुठेही दिसले नाही. याचे सर्व श्रेय येथील नगराध्यक्षांना देणे क्रमप्राप्त असल्याचे ते म्हणाले. गोसेवेसाठी ही देशभ्रमंती सुरू केली आहे.
गाय वाचविण्याची गरज असून, त्यासाठी समाजातील सर्व थरातील लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गायीच्याबाबतीत राजकारण करणे चुकीचे आहे. गीता, गायत्री आणि राम हेच सर्व समाजासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे त्याचे कुणी राजकारण करत असेल तर ते अयोग्य आहे, असे मत मोहम्मद खान यांनी मांडले.गोसंवर्धन काळाची गरज : मोहम्मद खानगाईचे संवर्धन ही काळाची गरज असून, याबाबत जनजागृतीसाठी आपली पदयात्रा सुरू आहे. कॅन्सरमुक्त भारत असा पण करून आपल्या या पदयात्रेला सुरुवात केली आहे. गायीपासून मिळणारे पंचगव्य मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने बहुपयोगी आहे. विविध आजारांवर औषध म्हणून उपयोगी ठरणाऱ्या पंचगव्याचा कॅन्सरमुक्त होण्यासाठीही वापर केला जातो, अशी माहिती खान यांनी दिली.