कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सावंतवाडी मतदारसंघ मिळावा, अशी पक्षाकडून मागणी करण्यात आली आहे. भाजपाचे वाढलेली ताकद पाहता ही रास्त मागणी आहे. सहा मतदारसंघांपैकी यापूर्वीचे चार-दोन हे समीकरण आता तीन-तीन व्हावे, अशी मागणी महायुतीच्या वरिष्ठांकडे केली असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सांगितले. येथील संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत काळसेकर म्हणाले की, गेली दोन वर्षे सातत्याने ही मागणी आमच्याकडून केली जात आहे. लोकसभा मतदारसंघातील चिपळूण, राजापूर, कुडाळ, सावंतवाडी हे विधानसभा मतदारसंघ शिवसेना आणि कणकवली, रत्नागिरी हे मतदारसंघ भाजपा लढवत आहे. बदललेल्या राजकीय स्थितीनुसार हे समीकरण आता तीन-तीन असे व्हावे आणि सावंतवाडी मतदारसंघातील स्थितीमुळे भाजपाकडे हा मतदारसंघ यावा. दोडामार्ग पंचायत समिती भाजपाकडे आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद भाजपाकडे आहे. या भागातील मोठ्या ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या तालुक्यातील लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गोव्याशी निगडीत आहेत. तेथे असलेल्या भाजप सत्तेचा त्यांच्यावर प्रभाव आहे. मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या सिंधुदुर्गातील सभांनाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. सावंतवाडीतून राजन म्हापसेकर किंवा मी स्वत: निवडणुक लढविण्यास इच्छुक आहे. परंतु, उमेदवार कोण हे आमच्या दृष्टीने तेवढे महत्त्वाचे नाही. कणकवलीतून आमदार प्रमोद जठार हे भाजपातर्फे निवडणुक लढवणार असून लोकसभेच्या निमित्ताने त्यांच्या प्रचाराची पहिली फेरी झाली आहे, असे काळसेकर म्हणाले. २६ ला सुराज्य दिन भाजपाची सत्ता स्वबळावर केंद्रात येऊन आमचा पंतप्रधान होणे हे जनसंघ आणि जुन्या भाजप कार्यकर्त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न आता साकार झाले आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची या दिवशी शपथ घेणार आहेत. मोदींनीही सुराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क असल्याची घोषणा सुरूवातीला केली होती. त्यामुळे सिंधुदुर्ग भाजपातर्फे हा दिवस सुराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी भाजप व जनसंघाच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन पेढे वाटले जाणार आहेत. तसेच दोन रॅली जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण भागातून सुटून कणकवली येथे सायंकाळी दाखल होतील. कणकवलीत विजयाचा जल्लोष केला जाणार आहे. देवगड, खारेपाटण, वैभववाडी येथून दुचाकी रॅली नांदगावपर्यंत येईल. तेथून आमदार जठार यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीपर्यंत येईल. तर दोडामार्ग येथून निघणारी रॅली बांदा, सावंतवाडी, कुडाळ, ओरोस, कसाल अशी कणकवलीत दाखल होईल. कणकवली येथे सायंकाळी भाजपा कार्यालयाबाहेर नरेंद्र मोदी यांचा शपथविधी स्क्रीनवर दाखवण्यात येणार असून प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्या विशेष उपस्थितीत सभा होणार आहे. सर्व जनतेने व भाजपाला साथ देणार्या नवमतदारांनी या जल्लोषी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन काळसेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
सावंतवाडी मतदारसंघ भाजपाला हवा अतुल काळसेकर
By admin | Published: May 24, 2014 1:00 AM