सावंतवाडी : हैदराबाद येथे सुरू असलेल्या एका क्लब क्रिकेट सामन्यात पंचांनी बाद दिल्यानंतर नाराजी व्यक्त करीत पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या क्रिकेटपटूचा पॅव्हेलियनमध्येच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी हैदराबाद येथील मैदानावर घडली. वीरेंद्र विठ्ठल नाईक (वय ४१) असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. तो मूळचा सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील असून, त्याचे पूर्ण कुटुंब हैदराबादमध्येच वास्तव्यास असते. वीरेंद्र हा एचएसबीसी बँकेकडून गेली अनेक वर्षे क्रिकेट खेळत होता. मंगळवारी त्याच्यावर आरोस येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. वीरेंद्र नाईक हा अनेक वर्षे हैद्राबाद येथे एचएसबीसी या बँकेत नोकरीला होता. तो मारडपल्ली क्रिकेट क्लबकडून खेळत होता. रविवारी झालेल्या सामन्यात वीरेंद्रने आपल्या संघासाठी ६६ धावांची खेळी केली होती. या दरम्यान यष्टीरक्षकाकरवी झेलबाद झाल्याचा निर्णय पंचांनी दिला; पण पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करून तो मैदानातून परतला होता. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर बॅट तसेच ग्लोव्हज व पॅड काढून तो पुन्हा मॅच पाहण्यासाठी इतर खेळाडूंमध्ये येऊन बसला होता. यावेळी अचानक त्याच्या छातीत कळा येऊ लागल्या आणि तो खाली कोसळला. त्याला लागलीच हैद्राबाद येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेनंतर क्रिकेट सामना तेथेच थांबविण्याचा निर्णय दोन्ही बाजूच्या कर्णधारांनी घेतला.या घटेनेनंतर वीरेंद्रच्या कुटुंबाला याबाबतची माहिती देण्यात आली. वीरेंद्रचे भाऊ अविनाश नाईक हे लागलीच रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी घडलेली घटना आपल्या नातेवाइकांना सांगितली. एका इंग्रजी वृत्तपत्राने वीरेंद्रच्या भावाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार वीरेंद्र हा गेले अनेक दिवस छातीत वेदना होत असल्याने वैद्यकीय उपचार घेत होता. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही त्याला पुढील आठ ते दहा दिवस क्रिकेट खेळू नको, असे सांगितले होते.दरम्यान, सोमवारी सकाळी गांधी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी उशिरा मृतदेह त्याच्या सावंतवाडी तालुक्यातीलआरोस या मूळ गावी नेण्यासाठी हे कुटुंब निघाले होते. मंगळवारी सकाळपर्यंत ते गावी पोहोचतील, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आरोस येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सावंतवाडीतील क्रिकेटपटूचा हैदराबादमध्ये हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:59 PM