सावंतवाडी : शहरात घडलेल्या दुहेरी हत्त्याकांडातील संशयित आरोपी कुशल नागेश टंगसाळी याचा सावंतवाडी पोलिसांनी पुन्हा ताबा घेत न्यायालयात हजर केले असता त्याला पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याला तीन दिवसापूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र अचानक ताब्यात घेण्यात आल्याने पुन्हा एकदा तपासा बाबत उत्सुकता लागली आहे. मात्र यावर पोलिसांनी अद्याप कोणतेही माहिती दिली नाही.निलिमा खानविलकर व शालिनी सावंत या दोन वृध्द महिलाच्या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी शेजारी राहत असलेल्या कुशल ऊर्फ विनायक नागेश टंगसाळी याला ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांनी त्याची तेव्हा एक दिवस पोलीस कोठडी मागून पुन्हा त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती परंतु आज त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत आरोपीचे वकील संकेत नेवगी यांनी आपली बाजू मांडली. संशयितांविरुद्ध पुरावे मिळत नसल्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा पोलिस कोठडीत घेण्याची गरज काय ?असा सवाल त्यांनी केला.यावेळी सरकारी पक्षातर्फे वेदिका राऊळ यांनी बाजू मांडली. काही तपास अजूनही बाकी आहे. कायद्याच्या तरतुदीनुसार संशयिताला पुन्हा एकदा न्यायाधीन कोठडी मधून पोलीस कोठडीत घेता येते. त्यामुळे त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. सरकारी पक्षाची बाजू ग्राह्य धरून न्यायालयाकडून एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर कोरे यांना विचारले असता अधिकचा तपास करायचा असल्यामुळे आम्ही त्याला पुन्हा पोलिस कोठडीत घेतले, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
सावंतवाडी दुहेरी हत्याकांड : आरोपीच्या कोठडीत वाढ, कारण मात्र गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 7:35 PM