सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा अखेर पंधरा दिवसानंतर झाला. याप्रकरणी बेपत्ता युवक कुशल ऊर्फ विनायक नागेश टंगसाळी याला ताब्यात घेण्यात आले असून, शनिवारी रात्री उशिरा त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आज, रविवारी कुशल याला न्यायालयात हजर करण्यात आले असता ८ ग्रॅम सोन्यासाठी हे हत्याकांड केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. मात्र दुसरीकडे पोलिसांनी एवढ्या मोठ्या हत्याकांडाच्या तपासासाठी चक्क दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. तर, न्यायालयाने संशयित कुशल यास एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
सावंतवाडी उभाबाजार येथे राहत असलेल्या निलिमा खानविलकर व शालिनी सावंत या वृध्दाचे हत्याकांड झाले होते. त्याचा उलगडा तब्बल पंधरा दिवसानंतर झाला असून शेजारी राहणारा युवक कुशल टंगसाळी याने कर्ज असल्याने पैशांच्या लोभापायी हे हत्याकांड घडवून आणले आहे. कुशल याची चौकशी करण्यात आली होती. पण नंतर त्याने विषप्राशन करून घरातून निघून गेला होता. त्याला वेंगुर्ले आणण्यात आले पण त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले होते. तो काहि दिवस घरातच होता पण चार दिवसापूर्वी पुन्हा घरातून निघून गेला होता. त्याला सावंतवाडी पोलीसांनी ठाण्यातून ताब्यात घेतले होते.
शनिवारी सकाळी सावंतवाडीत आणण्यात आले त्यानंतर त्यांची पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे याच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, पोलीस उपअधीक्षक नितीन काटेकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे, तैसिफ सय्यद, महेंद्र घाग यांनी कसून चौकशी केली त्यानंतर शनिवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी रात्री आरोपीच्या घरी जाऊन तपासणी केली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला घरगुती चाकू तसेच खानविलकर याच्या गळ्यातून चोरलेली सोन्याची चेन वितळलेल्या स्थितीत जप्त करण्यात आली आहे. ही चेन साधारणता 8 ग्रॅम होती त्याची किंमत बाजारभावानुसार अवघी 35 हजार एवढी होता. सोन्याच्या दागिन्यांसाठीच हा खून करण्यात आला असल्याचे प्रथम दर्शनी तपासात निष्पन्न झाले आहे. परंतू या प्रकरणात आणखीन कोणाचा सहभाग आहे का ?हे मात्र निष्पन्न झाले नाही. मात्र यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? तसेच आरोपी पंधरा दिवस कोणाच्या संर्पकात होता का? हे मात्र कोडे अद्याप उलगडले नाही.
पोलिसांना आरोपी कडून आत्महत्येची धमकी
संशयित आरोपीने आतापर्यंत दोन वेळा आत्महत्येची धमकी कुटूंबाला दिली होती. शनिवारी रात्री ही पोलिसांना अशाप्रकारे धमकी दिल्याचे बोलले जात आहे. मात्र पोलिसांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. मात्र, संशयिताच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.