सावंतवाडी : सावंतवाडी व वेंगुर्ले नगरपालिकेत युती व्हावी, ही आमची इच्छा होती, पण पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आम्हाला विश्वासात घेतले नसल्यानेच युती झाली नाही. युती झाल्याबाबत कोण गैरसमज पसरवित असेल, तर त्याकडे कोणी लक्ष देऊ नये. भाजप सावंतवाडी व वेंगुर्लेत स्वबळावर निवडणूक लढणार आहे, असे माजी आमदार राजन तेली यांनी जाहीर केले. ते सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. आता शिवसेनेबरोबर युती कदापि शक्य नाही. आमची लढत काँग्रेसबरोबर नसून शिवसेनेबरोबरच आहे, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक उमाकांत वारंग, तालुकाध्यक्ष मनोज नाईक, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, राजू गावडे, महेश पांचाळ, अमित परब आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार तेली म्हणाले, मालवण व देवगड येथे जर युती होत असेल, तर वेंगुर्ले व सावंतवाडी येथेच युती का नाही? पालकमंत्री दीपक केसरकर हे भाजप नगण्य आहे, अशी आमची खिल्ली उडवित राहिले. त्यामुळेच युतीला वेळ झाला. आता युतीची बोलणी करण्याची वेळ निघून गेली असून, भाजप सतरा जागांवर निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले आहे. जर पालकमंत्री दीपक केसरकर युतीबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी करण्याचे सांगत असतील, तर आमच्या वरिष्ठांना घडलेल्या घडामोडी पटवून दिल्या जातील. मंत्री रवींद्र चव्हाण हे युती करण्यासाठी तीन दिवस सावंतवाडीत ठाण मांडून होते. मग या बैठकीला मंत्री केसरकर का आले नाहीत? असा सवाल करीत मंत्री केसरकर यांना युती करायची नसल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलले असून, भाजपच्या उमेदवारांमध्ये तसेच जनतेत ते गैरसमज पसरविण्याचे काम करीत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. आम्ही युती करणार नाही. त्यामुळे मंत्री केसरकर हे दिशाभूल करीत असतील तर त्याला बळी पडू नका, असे आवाहनही माजी आमदार तेली यांनी यावेळी केले. पाच वर्षांपूर्वी सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत मंत्री केसरकर यांनी तत्कालीन भाजपच्या नेत्यांना नगरपालिकेत आपल्या एखाद्या पदाधिकाऱ्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून घेणार, असे आश्वासन दिले होते. मग अद्यापपर्यंत हे आश्वासन का पाळण्यात आले नाही, असा सवाल करीत भाजप सतराही जागा लढवून सावंतवाडी शहरात आमची ताकद किती आहे ती अजमावून बघेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) अन्नपूर्णा कोरगावकर यांची समजूत काढणार ४गेली दोन वर्षे महिला तालुकाध्यक्षा म्हणून अन्नपूर्णा कोरगावकर यांनी चांगले काम केले आहे. मात्र, काही अडचणींमुळे प्रभाग ५ मधून त्यांना उमेदवारी देता आली नाही. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ४मात्र, भाजप वरिष्ठ पातळीवरून नक्की त्यांची समजूत काढेल, असेही यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी, वेंगुर्लेत लढत युतीशिवाय
By admin | Published: November 01, 2016 11:43 PM