प्रसन्न राणे - सावंतवाडी--हिंदूंच्या सण, उत्सवांमध्ये फटाक्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेश चतुर्थीही याला अपवाद नाही. गणरायाच्या स्वागतापासून संपूर्ण उत्सव कालावधीत घराघरात फटाक्यांची आतषबाजी सुरू असते. विसर्जनादिवशी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणरायाला निरोप दिला जातो. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी बाजारपेठेतील फटाक्यांची दुकाने आता गजबजू लागली आहेत. विविध प्रकारच्या फटाक्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे. फटाक्यांच्या खरेदी-विक्रीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. समस्त कोकणवसीयांच्या जिव्हाळ्याचा सण गणेश चतुर्थी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. लहान-सहान सर्वांनाच गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. त्याच्या स्वागतासाठी घरे, शहरे सज्ज झाली आहेत. गणेश सजावटीच्या विविध साहित्याने बाजार पेठेतील दुकाने सजली आहेत. गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत अत्यावश्यक असलेल्या फटाक्यांची दुकानेही गजबजू लागली आहेत. गणेशोत्सवाची सर्व खरेदी झाल्यानंतर शेवटची खरेदी म्हणजे फटाके. फटाक्यांचा गतवर्षीचाच दर यावर्षीही कायम असला, तरी मालाच्या अल्पपुरवठ्यामुळे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे फटाके खरेदीसाठी ग्राहकांची घाई दिसून येत आहे. बच्चे कंपनीचे आकर्षण गणेशोत्सवाच्या कालावधीत फटाक्यांची आतषबाजी ही नित्याचीच. आता फटाक्यांमध्येही वेगवेगळे प्रकार मिळत असल्याने युवक आणि लहानग्यांचा फटाके खरेदीकडेच जास्त कल आहे. फटाक्यांमध्ये फुलबाज्या, भुईचक्र, पेटारे, किटकॅट, लहान आपटबार आदींचा सामावेश होतो. लहान मंडळी तर गणेशोत्सवाच्या कालावधीत फटाक्यांच्या या सर्व साहित्याने सज्जच असते. फटाक्यांच्या दुकानांचे बच्चे कंपनीला आकर्षण असते. सार्वजनिक गणेशोत्सवातही फटाक्यांची आतषबाजी केली जाते. गणेशोत्सवाच्या कालावधीत फटाक्यांच्या खरेदी-विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. घाऊक व्यापाऱ्यांबरोबरच शहरातील काही किरकोळ व्यापारीही गणेशोत्सवाच्या कालावधीत फटाक्यांची दुकाने मांडतात. हा हंगामी व्यवसाय असला, तरी बेरोजगारांसाठी कमाईचे चांगले साधन आहे. बाजारात नवीन सायरन, शिटी चक्र, रंगीत धूर असे नवीन प्रकारचेही फटाके मिळत आहेत. सावंतवाडी येथील बाजारपेठेत शिवकाशी येथून फटाक्यांचा माल आणून विकला जातो. शासन नियमांच्या चौकटीतच येथे फटाके विक्री होत असल्याने ग्राहकही बिनदिक्कतपणे फटाके खरेदी करत आहेत.
सावंतवाडी फटाक्यांच्या दुकानात गजबज
By admin | Published: August 27, 2014 10:39 PM