सावंतवाडी : रविवारी सायंकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सोमवारी सकाळी तर सावंतवाडी शहरातील जयप्रकाश चौकात पाणी आले होते. पाणी चार ते पाच दुकानात शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. तर चितारआळी भागात संरक्षक भिंत कोसळल्याने नुकसान झाले आहे. तालुक्यात आंबोली घाटात दरडीची माती खाली आल्याने काहि काळ वाहतूकही ठप्प झाली होती. तर चौकूळ येथेही नदी तुडूंब भरून वाहत होती. तसेच झाराप पत्रादेवी मार्गावर नेमळे येथे पाणी आल्याने अनेक वाहनधारक रस्ता शोधत वाहतूक करताना दिसत होते. पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक ठिकाणी पाणी येण्याची भीती महसूल विभागाने व्यक्त केली आहे.सावंतवाडी तालुक्यात रविवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी ही पावसाचा जोर तसाच होता. पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळल्याने मोती तलावाच्या पाण्याची पातळी वाढली होती. तसेच शहरातील जयप्रकाश चौकात अनेक दुकानात पाणी शिरले होते. तर रस्त्यात पाणी भरल्याने अनेक वाहनधारक रस्ता शोधत वाहतूक करताना दिसत होते. पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले होते. त्यामुळे बाजारातही सकाळच्या सत्रात तुरळक माणसे दिसत होती. सोमवार असूनही बाजारात गर्दी नव्हती. येथील चितारआळी भागातही पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली. यात कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.सावंतवाडी शहराबरोबरच तालुक्यातही पावसाचा जोर कायम असल्याने आंबोली, चौकुळ तसेच नेमळे, निगुडे अशा अनेक गावांना याचा फटका बसला आहे. आंबोली घाटातील दरडीची माती खाली आल्याने काहि काळ वाहतूक ठप्प झाली होती. पण नंतर माती बाजूला करून वाहतुक सुरळित सुरू झाली. त्या शिवाय चौकुळ येथील नदीलाही पूर आला आहे. तर नेमळे येथे झाराप पत्रादेवी महामार्गावर पाणी आल्याने अनेक मोठे वाहनधारक रस्ता शोधत मार्ग काढताना दिसत होते. दुपारी उशिरा येथील पाणी कमी झाले. त्यानंतर वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आली होती.पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानीचे पंचनामे उशिरापर्यंत झाले नव्हते, असे महसूल विभागाने स्पष्ट केले. ही हानी सुमारे पाच ते दहा लाख रूपयांच्या घरात जाउ शकते, असे मत महसूलच्या अधिकाºयांनी व्यक्त केले. मात्र या पावसामुळे कुठेही जीवितहानी झाली नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
धो धो पावसाने सावंतवाडीकरांची तारांबळ, शहरात घुसले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 5:15 PM