सिंधुदुर्ग : नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीची बैठक सोमवार सायंकाळी दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पार पडली. यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव १२ डिसेंबरला जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आपल्या एका उमेदवाराचे नाव पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे पाठवणार आहेत. त्यातून एक नाव निश्चित केले जाईल, असे यावेळी ठरविण्यात आले.
सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा बबन साळगावकर यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना व भाजप या सर्व पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. तर पक्षाला बंडखोरीची लागण होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १२ डिसेंबरला पक्षाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते.
त्यांनतर आता महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा १२ डिसेंबरलाचं जाहीर होणार आहे. दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत हे ठरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाकडून आपल्या एक उमेदवाराचे नाव पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येणार आहे. त्यांनतर त्यातून एक नाव निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली आहे.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विरोधात भाजपचाच उमेदवार असणार आहे. जिल्ह्यातील राजकरणात सावंतवाडीच्या नगरपालिका केंद्रबिंदू समजली जाते. त्यामुळे येथील सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात असाव्यात म्हणून सर्वच पक्षांना अपेक्षा लागली आहे.