सावंतवाडी : येथील पोलीस ठाण्याचा १०० नंबर दूरध्वनी कित्येक दिवस बंद अवस्थेत आहे. मात्र याकडे प्रशासनाने पूर्णत: डोळेझाक केल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नूतन इमारतीत स्थलांतर झाले. त्यामुळे सर्व यंत्रणा पुन्हा नव्याने उभारण्याचे काम पोलीस प्रशासनाला करावे लागले. अद्यापही काही यंत्रणा अपूर्ण अवस्थेत आहेत. मात्र सर्वसामान्य जनतेला आपल्या अडीअडचणीच्या वेळी पोलिसांना संपर्क साधण्यासाठी येथील पोलीस ठाण्यात असलेला दूरध्वनी गेले कित्येक दिवस वारंवार बिघडत आहे. त्यामुळे एखाद्या वेळी पोलिसांची मदत अथवा काही घटनेबाबत दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता समोरून दूरध्वनी बंद असल्याचा संदेश मिळतो.
त्यामुळे एखाद्या घटनेबाबत माहिती देण्यास विलंब होतो. सावंतवाडी पोलीस ठाणे जाणूनबुजूून याक डे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. एकीकडे पोलीस शहरात किंवा ग्रामीण भागातील परिसरात काही गुन्हा किंवा संशयित घटना घडल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करतात. तर दुसरीकडे मात्र गेल्या पंधरा दिवसांहून अधिक दिवस वारंवार बंद पडत असलेला दूरध्वनी दुरूस्त करण्याची साधी तसदी प्रशासन घेत नाही. यावरून कायदा सुवव्यवस्थेची भाषा करणारे सावंतवाडी पोलीस प्रशासन किती जबाबदार आहे हे स्पष्ट होते, असे नागरिकांतून बोलले जात आहे. पोलीस प्रशासनाने याबाबतची जबाबदारी एका व्यक्तीवर सोपविणे गरजेचे असून बंद असलेला दूरध्वनी त्वरित सुरू करणे आवश्यक आहे.
अनोळखी कॉलमुळे पोलीस हैराणपोलीस ठाण्यात असलेल्या १०० नंबरच्या दूरध्वनीवर दिवसातून अनेकवेळा अनोळखी व्यक्ती कामाव्यतिरिक्त संपर्क साधतात. यामध्ये लहान मुलांकडून फोन करण्याचे प्रमाण जास्त असते. या वारंवार येणाºया फोन कॉलमुळे ठाणे अंमलदाराच्या खुर्चीवर बसलेला पोलीस कर्मचारी हैराण होतो. १०० नंबर हा मोफत असल्यामुळे हा प्रकार करण्यात येतो. त्याच्यावर बंधन येणे गरजेचे असल्याचे पोलीस कर्मचाºयांचे म्हणणे आहे.