सावंतवाडी : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात रंगपंचमी हवी तशी साजरी केली गेली नाही. ठिकठिकाणी युवकांनी रंगपंचमी साजरी केली खरी; पण रंगांची उधळण करताना मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगताना युवक दिसत होते.
शिमगोत्सवाची पाच दिवसांची धुळवड साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील युवकांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. दरवर्षीच्या तुलनेत वापरले जाणारे कृत्रिम रंग यावर्षी कमी वापरले गेले. त्याची जागा नैसर्गिक रंगांनी घेतली होती.सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी पाचव्या दिवसाची रंगपंचमी साजरी करण्यात आली. येथील सालईवाडा, वैश्यवाडा, उभाबाजार, माठेवाडा आदी परिसरात युवकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोना व्हायरसमुळे जागतिक स्तरावर दक्षता घेण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातदेखील आवाहन करण्यात आले आहे.मात्र, पारंपरिक होळी सणाच्या निमित्ताने रंगपंचमीची धुळवड साजरी करण्यात आली. तरुण डिजेच्या तालावर नाचत होते. रंगपंचमीनंतर युवकांनी मोती तलावाच्या काठावरून सायंकाळी उशिरा गाड्यांवरून फेरफटका मारला. यावेळी मोठ्या प्रमाणात युवाई रंगात न्हाऊन गेली होती.