सावंतवाडी : येथील संस्थानचे युवराज लखम सावंत-भोसले यांनी राजकारणात एन्ट्री केली. आज, सोमवारी भाजपात प्रवेश करत त्यांनी सर्वानाच धक्का दिला. मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, पत्नी श्रद्धाराणी भोसले, दाजी राऊळ आदी उपस्थित होते.सावंतवाडी राजघराण्यातील एक व्यक्ती भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा दोन दिवसापूर्वीच होती. मात्र या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लखम यांनी भाजपात प्रवेश केल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आयत्यावेळी विधानसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाल्यास अनेक इच्छुक उमेदवारांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.सावंतवाडी मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपला यश मिळणार?लखम हे राजघराण्यातील असून त्याच्या आजोबांनी अनेक वर्षे या भागाचे प्रतिनिधित्व ही केले होते. तसेच त्याचे अनेक चाहते हे या सावंतवाडी, दोडामार्गसह वेंगुर्ला तालुक्यात सुद्धा आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सावंतवाडी मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्नात असलेल्या भाजपला यश मिळण्याची शक्यता आहे.लखम यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली जाणारलखम सोमवारी भाजपात प्रवेश केला असला तरी पक्षाकडून त्याना कोणते पद दिले जाईल हे अद्याप निश्चित झाले नसून पक्षपातळीवर कोणतेही आश्वासन देण्यात आले नसल्याचे समजते. परंतु येणाऱ्या काळात त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविली जाणार आहे. आजच्या प्रवेशावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच येथील राजघराण्यातील एक युवा चेहरा भाजपला मिळाल्याने त्याचा निश्चितच फायदा भाजपला होईल अशी अपेक्षा ही फडणवीस यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम-सावंत यांची राजकारणात एन्ट्री, भाजपात केला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 5:54 PM