सावंतवाडी :रिझर्व्ह बॅंक ने निर्बंध लादलेल्या सावंतवाडी अर्बन बॅंकेच्या विलीनीकरणाच्या हालचाली आता सुरु झाल्या आहेत. ठाणे येथील टीजेएसबी म्हणजेच ठाणे जनता सहकारी सहकारी बॅंकेत सावंतवाडी अर्बन बॅंकेचे विलीनीकरण होणार असून या संदर्भात टीजेएसबी बॅंकेची सर्वसाधारण सभा २१ जुनला होणार आहे.त्यात हा निर्णय होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या सर्वसाधारण सभेचा अजेंडा वृत्तपत्रात बँकेकडून प्रसिद्ध झाला आहे.
सावंतवाडी अर्बन बॅंक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी सहकारी संस्था आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्ह्यात आहे. सावंतवाडी अर्बन बॅंकेवर रिझर्व्ह बँकेकडून आठ महिन्यांपुर्वी निर्बंध लादण्यात आले होते. बॅंकेच्या व्यवहारांवर निर्बंध आल्यानंतर बॅंक अडचणीत आली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने सभासदांकडुन तीन कोटीचे भागभांडवल जमा करण्याचा निर्धार केला. त्यानुसार दिड कोटीहून अधिक भागभांडवल जमा झाले. अद्याप बॅंकेवरील निर्बंध उठलेले नाहीत. परंतु अर्बन बॅंकेच्या विलीनीकरणाच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या आहेत. यापुर्वी अर्बन बॅंक अपना सहकारी बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव होता. परंतु त्यावर शिक्कामोर्तब झाले नाही. दरम्यानच्या काळात सावंतवाडी अर्बन बॅंक अन्य बॅंकेत विलीनीकरणाबाबत चर्चा होत्या. याच दरम्यान आता सावंतवाडी अर्बन बॅंक ठाणे येथील टीजेएसबी सहकारी बॅंकेत विलीनीकरणाच्या संदर्भात हालचाली सुरु झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर टीजेएसबी सहकारी बॅंकेने २१ जुनला सावंतवाडी अर्बन बॅंक व आणखी एक बॅंक विलीन करण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. सावंतवाडी अर्बन बॅंक टीजेएसबी बॅंकेत विलीन झाल्यानंतर या बॅंकेचे नाव सावंतवाडी अर्बन बॅंक राहणार की बदलण्यात येणार, याबाबत अद्याप तरी प्रश्नचिन्ह आहे.टीजेएसबी ही बॅंक ठाण्यातील अग्रगण्य अशी बॅक मानली जाते.त्यात विलीनीकरण झाल्यास बँकेचा फायदा होणार आहे.