सावंतवाडी :जम्प नेटवर्कच्या माध्यमातून सावंतवाडी शहरामध्ये मोफत वायफाय सेवा देण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात ही सेवा सुरू करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील मोफत वायफाय असलेले सावंतवाडी हे पहिले शहर ठरेल. त्यानंतर हळहळू संपूर्ण जिल्हाभरात हे जाळे विणले जाणार आहे. त्यासाठी दूरसंचार कंपनीशी करार करण्यात आला असून दूरसंचारकडून सीमकार्ड माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे याठिकाणी सुरू करण्यात येणारी ही सेवा भविष्यातही सुरळीत चालू राहण्यासाठी साबळे यांनी स्वत: यात लक्ष घालावे, असे माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर म्हणाले.
सावंतवाडीत एखादी गोष्ट व्हायला वेळ लागतो. मात्र, भविष्यात त्याची भरभराट होते. जम्प नेटवर्कही येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला महत्त्वाचा दुवा ठरेल, असे मत केसरकर यांनी येथे व्यक्त केले. जम्प नेटवर्कच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर १०० लोकांना मोफत सेटअप बॉक्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, हर्ष साबळे, मकुंदन राघवन उपस्थित होते.केसरकर म्हणाले, मी पालकमंत्री असताना ज्या घोषणा विकासाच्या दृष्टीने केल्या होत्या त्यातील जम्प नेटवर्क हे एक आहे. जम्प नेटवर्कच्या माध्यमातून लवकरच ५०० बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात येणार आहे. या जम्प नेटवर्कचे सेटअप बॉक्स दुसऱ्या टप्प्यात सावंतवाडी शहरात बनविण्यात येणार असून, मेक इन इंडिया ही संकल्पना याठिकाणी सत्यात उतरविण्यात येणार आहे. याचे सर्व श्रेय साबळे यांना द्यावे लागेल.