सिंधुदुर्ग : वैभववाडी-तळेरे मार्गालगतच्या नाधवडे येथील अरविंद सावंत माध्यमिक विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री डल्ला मारला. विद्यालयाच्या छपराची कौले काढून चोरट्यांनी दोन एलसीडी टीव्ही आणि स्पीकर संच असा सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी शाळा आणि परिसरातील एकूण चार खोल्या फोडल्याची माहिती मिळाली आहे.
सोमवारी सायंकाळी विद्यालयाचे शिपाई श्रीकृष्ण मधुकर टक्के हे सर्व खोल्या बंद करून घरी गेले. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे शाळेत गेले. तेव्हा त्यांना दहावीच्या वर्गाची कौले काढल्याचे दिसून आले.
याशिवाय आणखी दोन खोल्या फोडल्याचे निदर्शनास आले. दोन वर्गात असलेल्या दोन एलसीडी टीव्ही आणि जुना स्पीकर संच चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मुख्याध्यापक अशोक शंकर कुबडे यांना ही माहिती दिली.
चोरीची ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, प्रकाश गरदरे, बी. बी. चौगले, गणेश भोवड, दादा कांबळे घटनास्थळी पोहोचले. शाळेतील ३२ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे त्यांना मुख्याध्यापकांनी सांगितले. दरम्यान, विद्यालयातील तीन आणि परिसरातील एका खासगी शैक्षणिक इमारतीत चोरट्यांनी प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यालयातील सीसीटीव्ही बंद
विद्यालयात काही वर्षांपूर्वी सीसीटीव्ही यंत्रणा बसविली होती. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे ती गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. विद्यालयातील सीसीटीव्ही कार्यान्वित असते तर चोरटे सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये कैद होऊन पोलिसांना त्यांच्या मुसक्या आवळणे सोपे झाले असते.