रत्नागिरी : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या १५७ प्राथमिक शाळांच्या इमारतींचे छतावरील पाणी बोअरवेलमध्ये सोडून नैसर्गिकरित्या पुनर्भरण करुन पाण्याच्या पातळीत वाढ करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी सर्वाधिक पाऊस पडूनही खडकाळ जमिनीमुळे नद्या, नाल्यांद्वारे पावसाचे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते, त्यामुळे एप्रिल, मे महिन्यांत भीषण पाणीटंचाई उद्भवते. त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई उद्भवणार हे निश्चित आहे. मात्र, त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने लोकसहभागातून मिशन बंधारे २०१५च्या माध्यमातून वनराई बंधारे, कच्चे बंधारे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत श्रमदानातून सुमारे साडेचार हजार बंधारे उभारण्यात आले आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाईमुळे प्राथमिक शाळांनाही ती जाणवत असते. अनेकदा पाण्यासाठी विद्यार्थ्यांनाही या टंचाईच्या कालावधीत त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी या पाणीटंचाईचा त्रास जाणवू नये, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने आतापासूनच उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करुन जिल्हा परिषदेने पाणी साठवण्याबाबतचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी प्राथमिक शाळांमधील विंधन विहिरींची उन्हाळ्यातही पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी आतापासूनच उपाय योजले जात आहेत. त्यासाठी येत्या पावसाळ्यात या प्राथमिक शाळांच्या छतावरील पाणी या विंधन विहिरींमध्ये सोडण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)
शाळांच्या छतावरील पाणी विंधन विहिरीत
By admin | Published: January 10, 2016 11:31 PM