सुधीर राणे कणकवली : नवी कोरी पुस्तकं, वह्या... नव्या मित्र-मैत्रिणी... नवीन वर्गात बसण्याची उत्सुकता... नवा युनिफार्म... काहींसाठी तर नवी शाळा... मनात थोडीशी भीतीही... शाळेचे नाव काढताच रडवेले झालेले चेहरे... रडणाऱ्या मुलांना वर्गात बसविण्यासाठी शिक्षकांची धावपळ... विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी केलेली जय्यत तयारी... अशा वातावरणात आणि मुलांच्या किलबिलाटात कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सोमवारी पुन्हा एकदा बोलक्या झाल्या.जिल्हाभरातील शाळा सुरू होण्याचा सोमवारी तसा पहिला दिवस होता. त्यामुळे मुलांबरोबरच पालकांची लगबग सकाळपासूनच सुरू होती. शाळा म्हणजे आई-वडिलांपासून लांब जाणं शाळा म्हणजे कडक शिक्षक, शाळा म्हणजे फक्त अभ्यास असा विचार करीत रडविल्या चेहऱ्यांनी काही नवागत मुलांचे शाळेत पहिले पाऊल पडले. शाळेच्या पहिल्या दिवशी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुष्प , चॉकलेट्स आणि भेटवस्तू देखील देण्यात आल्या.नवा गणवेश परिधान करून आलेल्या या मुलांनी नवे मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांशी पहील्याच दिवशी गट्टी देखील केल्याचे अनेक शाळांमध्ये दिसून आले . आई-वडिलांपासून दूर जाण्याच्या भीतीने रडू कोसळलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर शाळेतील जल्लोष पाहून हसू उमलले. अवघ्या काही क्षणात रडू विसरून इयत्ता पहिलीत प्रवेश केलेली मुले शाळेतील नवे मित्र, वर्ग, शाळेचे पटांगण यामध्ये रमून गेली होती.' आम्ही यावर्षी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत आलो आहोत. त्यामुळे आम्हाला छान वाटत आहे. नवीन शिक्षक, नवीन मित्र कसे असतील याबद्दल उत्सुकता आहे. नवीन वर्ग, नवीन विषय... हे सगळंच खूप आनंददायी आहे.' अशी प्रतिक्रिया पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यानी व्यक्त केली. ' मुलांसाठी शाळेचा पहिला दिवस खास असतो, त्यामुळे आज ऑफिसमधून सुटी घेऊन मुलाला सोडायला शाळेत आलो आहे. नवीन विषयांचा अभ्यास मुलांकडून करून घेणे, हे एक आव्हान आहे. अशा प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केल्या. एकंदर मुलांसाठी आणि पालकांसाठी शाळेचा पहिला दिवस तसा धावपळीचाच ठरला.....आणि गप्पांचे फड रंगले !परीक्षा संपून उन्हाळी सुट्टीवर गेलेली मुले सोमवारी पुन्हा शाळेत परतली. सुट्टीमध्ये केलेल्या गमती जमतींबाबत मित्र , मैत्रिणींना माहिती देताना अनेक मुले दिसत होती. त्यांचे गप्पांचे फड चांगलेच रंगले होते.