वैभववाडी : उंबर्डे येथील उर्दू प्राथमिक शाळेतील वादग्रस्त शिक्षिकेच्या निलंबनाच्या मागणीसाठी तेथील ग्रामस्थांनी पहिल्याच दिवशी शाळाबंद आंदोलन केले. शाळेला टाळे ठोकून ग्रामस्थांनी पंचायत समिती गाठली. अधिकाऱ्यांच्या ठोस कारवाईच्या आश्वासनाअंती ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे दुपारनंतर शाळा भरवण्यात आली. उर्दू प्राथमिकच्या शिक्षिकेने गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीविरूद्ध गेल्या आॅक्टोबरमध्ये पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर तिने स्वत:च तक्रार मागे घेतल्यामुळे खातेनिहाय चौकशी करून या वादग्रस्त शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. तशाप्रकारचा ठरावही पंचायत समिती सभेत झाला होता. मात्र उन्हाळी सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी वादग्रस्त शिक्षिकेवरील कारवाईचा पत्ता नसल्याने पहिल्याच दिवशी मेहबूबनगरच्या ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलनाचे अस्त्र उपसून प्रशासनाचे लक्ष वेधले. शाळेला टाळे ठोकल्यानंतर ग्रामस्थांनी पंचायत समिती गाठली. या वादग्रस्त शिक्षिकेच्या निलंबनाची मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे लावून धरली. त्यामुळे गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्या शिक्षिकेवर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन देत ती शिक्षिका उंबर्डे उर्दू शाळेत फिरकणार नाही अशी व्यवस्था केली जाईल असे स्पष्ट केले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनाअंती मेहबूबनगरच्या ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर दुपारी शाळा भरवून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केल्याचे गटशिक्षणाधिकारी शेर्लेकर यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार त्या वादग्रस्त शिक्षिकेवर काय कारवाई होणार आणि कधी होणार याकडे मेहबूबनगरवासीय यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
पहिल्याच दिवशी शाळाबंद आंदोलन
By admin | Published: June 17, 2014 1:14 AM