महेश सरनाईक
तळेरे (सिंधुदुर्ग) : सन २०२४ ची लोकसभा निवडणूक समोर ठेऊन केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचल्या, सामान्यांच्या त्याबाबत प्रतिक्रीया काय आहेत? हे ४० केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून जाणून घेतल्या जाणार आहे. प्रत्येक राज्याचा राजकिय आराखडा तयार करणार असून त्याबाबत देशभरात केंद्रीय मंत्र्यांच्या सभा होणार आहेत. असे सांगतानाच लोकसभा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नसून आपण राष्ट्रीय स्तरावर काम करण्यास इच्छूक असल्याचे सूचक वक्तव्य राष्ट्रीय महामंत्री तथा लोकसभा प्रवास योजनेचे अखिल भारतीय संयोजक विनोद तावडे यांनी तळेरे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाच्या लोकसभा प्रवास योजनेची विशेष बैठक तळेरे येथील स्मित मल्टीपर्पज हॉल येथे झाली. त्यावेळी पत्रकारांशी तावडे बोलत होते. यावेळी लोकसभा प्रवास योजनेचे प्रदेश सहसंयोजक प्रमोद जठार, प्रदेश सचिव निलेश राणे, कोकण संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, आमदार नितेश राणे, लोकसभा प्रभारी संदीप लेले, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, अतुल काळसेकर, अजित गोगटे आदी उपस्थित होते.
गतवेळच्या १०७ जागा जिंकण्यासाठीची रणनिती
विनोद तावडे म्हणाले की, २०१९ च्या लोकसभेला भाजपाला ३०३ जागा मिळाल्या. २०२४ ला त्यापुढील १०७ जागांसाठी काम केले जाणार आहे. त्यासाठी राजकिय वस्तुस्थितीचे विश्लेषण करुन नेत्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात झाली आहे. १०७ जागांपैकी ७० ते ८० जागा कशा जिंकता येतील याची रणनिती बनविली आहे.
लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत हवा
यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार म्हणून आपण इच्छुक आहात का? याबाबत तावडे म्हणाले की, लोकसभेसाठी उमेदवार निश्चित झाला नसून पाच-सहा महिन्यांनंतर उमेदवार निश्चित होईल. त्यासाठी मी इच्छूक नसून आपण राष्ट्रीय स्तरावर काम करणार आहे. तर सध्याच्या राजकिय स्थितीवर तावडे म्हणाले की, लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत पाहिजे. मात्र, सध्या पक्ष आणि नेताही मजबूत नाही. राज्यात फडणवीस-शिंदे सरकार चांगले काम करीत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.