रामचंद्र कुडाळकर - तळवडे --गणेश उत्सव म्हटला की, कोकणवासीयांचा आराध्य दैवतेचा मोठा सण. या उत्सवाची चाहुलही एक महिना अगोदरच असते. हा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गणेश मूर्तिशाळा रात्रंदिवस गजबजू लागल्या आहेत. गणेश शाळेतील मूर्तिकार मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्यात मग्न आहेत. गणेश उत्सव जवळ आल्याने जिल्ह्यातील शहरातील बाजारपेठा भरून निघाल्या आहेत. रंगबेरंगी साहित्यांनी गजबजल्या आहेत. यावर्षी महागाईचे सावटही गणेशोत्सवावर निर्माण झाले आहे. रंगकाम, मजुरी, मातीचे वाढलेले दर याचा फटका गणेश भक्तांना बसणार आहे. त्याचप्रमाणे मूर्तीच्या दरात यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मूर्तिकार मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात दंग झालेले चित्र सर्रास पहावयास मिळत आहे. मूर्तीशाळांमध्ये सुरू असलेली ही लगबग पाहण्यासाठी बालचमूंनी एकच गर्दी केली आहे. शाळा सुटली की बालचमू मूर्तीशाळांकडे धाव घेत आहेत. रंगरंगोटीची अद्भुत किमया करणाऱ्या मूर्तिकारांच्या कुशलतेला पाहताना बालचमुंचा आनंद गगनाला भिडतो आहे. यंदाच्या गणेशोत्सवास महागाईची झळ बसणार आहे. त्यामुळे मूर्तींच्या किंमतीत वाढ होणार आहे. याबाबत तळवडे येथील गणेश मूर्तिकार ज्ञानदेव लक्ष्मण गावडे यांच्याशी चर्चा केली असता, गणेशमूर्तीच्या यावर्षी दरात थोडी वाढ झालेली आहे. भक्तगणांना याचा आर्थिक फटका बसतो. पण साहित्याच्या वाढलेल्या दरांमुळे हे सर्व दर वाढवावे लागतात, असे त्यांनी सांगितले. ज्ञानदेव गावडे हे गेली १५ वर्षे गणेशमूर्ती बनविण्याचे काम करतात. लहानपणापासून असलेली आवड त्यांनी पुढे व्यावसायिक दृष्टीने विकसित केली. जिल्ह्यातील नामवंत मूर्तिकार मांजरेकर यांच्या गणेश चित्रशाळेत या कलेची माहिती घेऊन रोजगारी, नोकरी करून नंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला. तळवडेसारख्या ग्रामीण भागात गणेश चित्रशाळा सुरू केली. कलेविषयी असलेली परिपूर्ण माहिती, रंगकामाचे कौशल्य यामुळे त्यांनी या व्यवसायात वेगळा छाप टाकला व प्रसिध्दी मिळविली. एकंदरीत विचार करता त्यांनी गणेशमूर्ती काम सुबकरित्या करण्याचा मानस ठेवला. समोर आलेल्या गणेशभक्ताला त्याची मनपसंत मूर्तिकाम करून देण्यात पसंती दर्शविली.आज युवापिढी गणेशमूर्ती काम करण्याकडे कमी आकर्षित होते. आज युवापिढीनेही या कलेकडे वळणे गरजेचे आहे. ही पारंपरिक कला आहे. याचा विकास आधुनिक बदलत्या युगाप्रमाणे होणे गरजेचे आहे. पण धार्मिक बांधिलकी ठेवून सर्व विकसित होणे गरजेचे आहे. रंगकाम हे आधुनिक होत असून, विविध रंग बाजारात येत आहेत. गणेश मूर्तिकारातही स्पर्धा होताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक गणेश मूर्तिकार आपली कला परंपरागत कशी टिकविता येईल, याकडे प्रत्येकाचे लक्ष आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करता गावागावात गणेश मूर्तिकार आहेत. पण त्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळणे कठीण आहे. सर्व मूर्तिकार शासनाच्या योजना व फायद्यापासूनच वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्या भवितव्याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आज जिल्ह्यात गणेश मूर्तिकार मोठ्या प्रमाणात आहेत. पण त्यांची एकजूट होणे गरजेचे आहे. एकजूट निर्माण झाल्यास समस्या निवारण होऊ शकतात, असे दिसून येते.
गणरायाच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात मूर्तिकार दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2015 9:40 PM