मिठबांव : मुणगे भंडारवाडी आडवळवाडी येथील ओहोळानजीकची जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी ओहोळानजीकच्या भातशेतीत घुसत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे.याठिकाणी छोट्या खार बंधाऱ्याचे बांधकाम केलेले आहे; परंतु उधाणाच्या भरतीवेळी हे बांधकाम अपुरे पडत असून, या बंधाऱ्याच्या बाजूने समुद्राचे पाणी शेतजमिनीत घुसते.यावर्षी भातकापणीच्या वेळी मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले. याचवेळी काही थोड्याफार प्रमाणात हाती मिळालेले पीक या भरतीच्या खाऱ्या पाण्यामुळे वाया गेले आहे. या नुकसानीमुळे या भागातील शेतकरी हतबल झाले आहेत. तुटपुंज्या शेतीवर गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी तसेच भविष्यात ही घटना पुन्हा घडू नये म्हणून आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
समुद्राचे पाणी भातशेतीत
By admin | Published: December 08, 2014 8:52 PM