वैभववाडी(सिंधुदुर्ग): विनापरवाना तोडलेले सागाचे दीड लाखाचे बेवारस लाकूड कोळपे येथील आरा गिरणीवर(साॅ मील) वन विभागाने जप्त केले. याप्रकरणी अज्ञात लाकूड व्यावसायिकाविरुद्ध वनाधिका-यांनी गुन्हा नोंदवला आहे. चौकशी दरम्यान आरा गिरण मालकाने कोळपेतील एका व्यक्तीचे नाव उघड केले आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे तालुक्यातील लाकूड व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. विभागीय वन अधिकारी प्रकाश बागेवाडी(कोल्हापूर), वनपाल चंद्रकांत देशमुख प्रकाश पाटील हे कोळपे तिथवली परिसरात फिरतीवर असताना त्यांना कोळपेतील आरा गिरणीवर सागाचे बेवारस लाकूड आढळून आले. लाकूड जप्त करीत गुन्हा अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्या लाकडाबाबत अधिका-यांनी आरा गिरण मालकाकडे चौकशी केली असता गिरण मालकाने तेथील जब्बार पाटणकर याने लाकूड आणून टाकल्याचे, वनाधिका-यांना सांगितले. वन अधिका-यांनी सागाच्या लाकडाचे 98 नग(साडेसात घनमीटर) जप्त केले. त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. जप्त केलेले लाकूड गिरण मालकाच्या ताब्यात दिले आहे. वन विभागाने आकस्मिक धाड टाकून केलेल्या कारवाईमुळे लाकूड व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून ही कारवाई चोरट्या लाकूड तोडीला आळा घालणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दोन जागी लाकूड पकडल्याची चर्चा
वनखात्याच्या अधिका-यांनी कोळपेतील आरा गिरणीवर सागाचे साडेसात घनमीटर बेवारस लाकूड जप्त करीत गुन्हा दाखल केला. मात्र, आरा गिरण आणि एका लाकूड व्यावसायिकाच्या घरानजिक अशा दोन ठिकाणी लाकूड पकडले. परंतु, फक्त आरा गिरणीवरील लाकडाचा पंचनामा करुन ते जप्त केल्याची जोरदार चर्चा कोळपे परिसरात सुरु आहे.