सिंधुदुर्गनगरी : आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त झालेले प्रस्ताव स्पर्धात्मक नसल्याने यावर्षी शिक्षक पुरस्कार दिले जाणार नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी सोमवारी केलेल्या एका विधानावरून शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी सभागृहात जोरदार हंगाम केला.
कोणाच्या दबावाला बळी पडून हे शिक्षक पुरस्कार दिले जात नाहीत असा सवाल सेनेचे सदस्य प्रदीप नारकर यांनी करत जिल्हा परिषदेवर आरोप केले. शिक्षक पुरस्कार न देणे हा आदर्श शिक्षकांवर होणारा अन्याय आहे. यात गुणवंत शिक्षक भरडला जातोय.
जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पुरस्कार देण्यात यावेत, अशी मागणी सेनेच्या सदस्यांनी रेटून धरली. मात्र यावर्षी शिक्षक पुरस्कार दिले जाणार नसल्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या विधानावर सत्ताधारी ठाम राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे आदर्श शिक्षक विषयावरून शिक्षक विरुद्ध सत्ताधारी सदस्य यांच्यात ठिणगी पडणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा अध्यक्षा समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाइन पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हेमंत वसेकर, समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, समिती सभापती शारदा कांबळे, बाळा जठार, समिती सदस्य तथा भाजपचे जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई, सेनेचे गटनेते नागेंद्र, सदस्य प्रदीप नारकर, संजय पडते, संजय देसाई, पल्लवी झिमाळ, रोहिणी गावडे, प्रितेश राऊळ, अमरसेन सावंत, दादा कुबल, संजना सावंत, संतोष साटविलकर अधिकारी खातेप्रमुख उपस्थित होते.सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष समिता नाईक यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार याविषयी भाष्य केले होते. शिक्षकांमधून स्पर्धात्मक प्रस्ताव न आल्याने यावेळेस आदर्श पुरस्कार दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले होते. आज पार पडलेल्या सर्वसाधारण हा मुद्दा जोरदार गाजला.
सभेत विरोधक गटाने हा मुद्दा उचलून धरत जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक व अन्य सत्ताधारी सदस्यांना धारेवर धरले. शिक्षक पुरस्कार नेमके का दिले गेले नाहीत. हा शिक्षकांवर झालेला अन्याय आहे. यामुळे शिक्षक भरडला जातोय. जिल्हाभरातून अठरा प्रस्ताव घेऊन देखील त्याची निवड का केली गेली नाही? कोणाच्या दबावाला पडून हे पुरस्कार जाहीर केले नाही. असा आरोप गटनेते नागेंद्र परब व सदस्य प्रदीप नारकर यांनी सभागृहात उपस्थित केला.
या आरोपाचे अध्यक्ष समिधा नाईक यांनी खंडन करत म्हणाल्या, प्रत्येक तालुक्यात शेकडो शिक्षक आहेत. या शिक्षकांमधून तालुक्यातून किमान पाच ते सहा प्रस्ताव येणे आवश्यक आहेत. मात्र तसे झाले नाही. स्पर्धात्मक प्रस्ताव प्राप्त न झाल्यानेच यावेळीचे दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले नाही अशी स्पष्टोक्ती अध्यक्ष नाईक यांनी सभागृहात दिली.कोरोनावर अद्याप लस आली नाही परंतु कोरोनाला काही प्रमाणात प्रतिबंध करण्यासाठी इंजेक्शनची निर्मिती झाली आहे, त्याचा पुरवठाही जिल्हा रुग्णालयात नसल्याचा आरोप संजना सावंत यांनी केला. तर सेनेच्या रोहिणी गावडे यांनी आपल्या मतदार संघातील नागरिकांना जिल्हा रुग्णालयातून उद्धट वागणूक मिळाली, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
आॅक्सीजन संपलेला असतो त्याकडेही कुणाचे लक्ष नसते असा अनुभव त्यांना असल्याचे सदस्य गावडे यांनी सांगत संताप व्यक्त करून कारभारात सुधारणा करावी अशी सूचना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अविनाश नलावडे यांना केली. या आरोपांवर नलावडे निरुत्तर झाले. रेडमिअरची ५०० इंजेक्शन दोन दिवसात उपलब्ध होतील अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.दोडामार्ग झरेबांबर ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार ?- अंकुश जाधवदोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर ग्रामपंचायतीने टेंडर प्रक्रिया न राबवता तसेच मूल्यांकन, ठराव न घेता ठेकेदाराला ५० टक्के बिल चेकने दिले असल्याचा आरोप सदस्य अंकुश जाधव यांनी करत जिल्हा परिषद अशा ग्रामसेवकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सदस्य जाधव यांनी केला. ४ सप्टेंबर रोजीची घटना आज अठरा दिवस झाले तरी ग्रामसेवकावर कोणतीच कारवाई होत नाही , ही निंदनीय बाब आहे.
कायदेशीर बाबींची पूर्तता न करता परस्पर चेकद्वारे शासनाच्या निधीचा अपव्यय करता येतो का असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी यावेळी चौकशीचे आदेश दिले.नाणारसाठी भाजपचा ठरावनाणार येथील बहुचर्चित ग्रीन रिफायनरी हा प्रकल्प झाल्यास सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार व सुशिक्षित तरुणांना मोठ्या संख्येने रोजगार मिळू शकतो. त्यामुळे हा प्रकल्प होणे गरजेचे असल्याची सुचना भाजप सदस्य सुधीर नकाशे यांनी सभागृहात मांडत तसा ठराव घेण्यात यावी, अशी सभागृहाला विनंती केली.याला सत्ताधारी भाजपच्या सर्व सदस्यांनी अनुमोदन देत तसा ठराव घेतला. परंतु सेनेच्या सदस्यांनी गदारोळ करत तुम्ही कितीही ठराव घेतले तरी कोकण समृद्धी नष्ट करणारा प्रकल्प सेना होऊ देणार नाही, असे सदस्य प्रदीप नारकर व नागेंद्र परब यांनी सभागृहाला ठणकावून सांगितले.