Aditya Thackeray vs Nilesh Rane clash : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण चांगलेच पेटलं आहे. या दुर्दैवी घटनेनंतर महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे किल्ल्याची पाहणी करत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत हे देखील तिथे आले. त्यावेळी आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. किल्ल्याच्या मुख्य द्वारावर राणे समर्थकांनी ठिय्या दिला आहे. या घटनेवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी इशारा दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे नेते आणि खासदार नारायण राणे एकाच वेळी किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले असता मोठा राडा झाला. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. पोलिसांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखून धरलं होतं. मात्र दोन्ही बाजूच्या समर्थकांनी आक्रमक होत हाणामारी सुरु केली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझासोबत बोलताना आमच्या सर्व नेत्यांनी सुरक्षितता आणि जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे, असं म्हटलं आहे.
"कायदा आणि सुव्यवस्था काय करते आहे तिथे. पोलिस यत्रंणा काय करत आहे. पोलिसांची यत्रंणा आहे ना तिथे. आमचे सर्व नेते जाणार हे आधीच सर्वांना माहिती होतं. जयंत पाटील यांच्यासोबत तेथील स्थानिक नेते तिथे जाणार होते ते माहिती होतं ना. त्यांनी काल दिवसभर माध्यमांनी सांगितलं होतं. मग सरकारचं इंटेलिजन्स काय करत आहे. गृहमंत्र्यांनी शांततेचं अपील केलं पाहिजे. मी बारामतीत आहे, मला जास्त काही माहिती नाही. नेमकं काय सुरू आहे. पण माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी सर्वांना अपील केलं पाहिजे. शांतता राखून त्यातून मार्ग काढला पाहिजे. काल आमचे नेते जाणार हे सर्वांना माहिती होतं. मग पोलीस आणि बाकीची यत्रंणा काय करत होती. आमच्या सर्व नेत्यांनी सुरक्षितता आणि जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे. आमच्या कोणत्याही नेत्यांच्या केसाला धक्का बसला तर बघा काय होतं, अतिशय चुकीच आहे," असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला आहे.