सिंधुदुर्ग - भारतात मी यापूर्वी पाचवेळा आलो आहे. मात्र, माझे आजोबा, वडील राहत असलेल्या वराड गावी येण्याचा योग पहिल्यांदाच आला असून गावात येऊन मला अतिशय आनंद झाला. माझे आडनाव या गावाशी जोडले आहे, याचाही आनंद असून आम्ही वराडकर कुटुंबीय गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांनी वराड (ता. मालवण) येथे व्यक्त केला. तर, बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा पाहून 'ही इज शिवसेना लिडर' असा उल्लेख आपसूकच त्यांच्या तोडून निघाला.
पतंप्रधान लिओ वराडकर यांनी शासकीय पातळीवर दौऱ्याचे आयोजन न करता घरगुती स्तरावर खासगी दौरा केला. कोणत्याही शासकीय यंत्रणेला या दौऱ्याची कल्पना नव्हती, असे चित्र होते. रविवारी सकाळी सिंधुदुर्गातील मालवण वराड या गावी ‘वरदश्री’ या निवासस्थानी लिओ वराडकर व कुटुंबीयांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. डॉ.लिओ वराडकर यांनी येथील मालवणी जेवणाचाही आस्वाद घेतला. त्यानंतर गावात आंबा काजू बागेत फेरफटका मारला. गावातील शाळेत विध्यार्थ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. गावातील वेताळ मंदिर व कट्टा येथील चर्चलाही त्यांनी भेट दिली. वराड येथे आपल्या निवासस्थानी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
सोमवारी सकाळी मालवण नगरपरिषदेलाही त्यांनी भेट दिली. त्यावेळी सभागृहात विविध राष्ट्रीय नेतेमंडळी यांच्या प्रतिमा त्यांनी पहिल्या. त्यात शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेकडे बोट दाखवत ‘ही इज शिवसेना लीडर’ असे उद्गार पंतप्रधान लिओ वराडकर यांनी काढले. विशेष म्हणजे बालपणापासून त्यांचा येथील मातीशी फारसा संबंध नाही, तरीही त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पाहून त्यांची ओळख पटवल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. त्यानंतर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व नगरसेवक नितीन वाळके यांच्याकडून पंतप्रधान वराडकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्या हस्ते लिओ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, या दौऱ्यात त्यांची चुलत बहीण शुभदा वराडकर यांनी दुभाषिकांची भूमिका बजावली.