वैभववाडी : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालकपदी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम ९ मे २०२३ रोजी जाहीर झाला होता. मात्र, त्यानंतर शासनाकडूनच या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती.राज्य सहकारी पणन महासंघाच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांसाठी दोन सर्वसाधारण जागा होत्या. या जागांसाठी सिंधुदुर्गातून वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी महायुतीकडून, तसेच मविआतर्फे व्हिक्टर डॉन्टस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याशिवाय रायगड येथील शेकापचे आमदार जयंत पाटील, सुरेश खैरे, ठाणे येथील मोहन अधेरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.दोन जागांसाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते; परंतु छाननीत डॉन्टस, खैरे आणि अंधेरे यांचे उमेदवारी अर्ज अवै ठरविण्यात आले. त्यानंतर १७ मे २०२३ रोजी शासनाकडून या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. २५ जानेवारी २०२४ रोजी उच्च न्यायालयाने ही निवडणूक प्रकिया योग्य ठरविली. त्यामुळे कोकण विभागातील निवडणूक बिनविरोध झाली आहे. संचालकपदी निवड झालेले रावराणे हे तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे सहकार क्षेत्रात ते काम करीत आहेत.
कोकणात मिश्र खतांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार : रावराणेपणन महासंघाच्या माध्यमातून कोकणातील विविध उत्पादनांचे ब्रँडिंग, विक्री व्यवसाय वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करणार आहे. याशिवाय आवश्यक ठिकाणी गोदाम, कोल्ड स्टोअरेज उभारण्यात येतील. त्याचबरोबर कोकणात मिश्र खतांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रमोद रावराणे यांनी स्पष्ट केले.