चिपळूण : तुळशी खुर्द येथील प्रकल्प्रगस्त कुटुंबातील कोणालाही अद्याप नोकरी न मिळाल्याने प्रकल्पग्रस्ताच्या कुटुंबाने खेड तहसील कार्यालयासमोर १ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. तसे पत्रक लक्ष्मण कासार यांनी प्रसिध्दीस दिले आहे. तुळशी खुर्द येथील आपल्या नावे असलेली जमीन सर्व्हे नं. ५८, ६४ आणि आईच्या नावावर म्हणजे निराबाई देवजी कासार हिच्या नावावर स. न. ५५/१ क ही संपूर्ण जमीन १९७२मध्ये शासनाने नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी संपादित केली. त्यावेळी शासनाने असे सांगितले होते की, प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देवू. १९७२ मध्ये जमीन संपादन करून शासनाने आपल्याला दि. १ एप्रिल १९८५ रोजी प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला दिला. त्यानुषंगाने कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीत प्राधान्य असून, दाखला मिळाल्यापासून आपण नोकरीसाठी शासनाकडे वेळोवेळी दारे ठोठावूनही शासनाने नोकरी दिली नाही. आता आपल्या कुटुंबाकडे कसायला अजिबात जमीन राहिलेली नाही. तसेच शासनानेही नोकरी न दिल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्याला न्याय मिळावा, यासाठी २५ व २६ जानेवारी २०१३ रोजी तहसील कार्यालय, खेड यांच्यासमोर कुटुंबीयांसह उपोषण केले होते. त्या उपोषणामध्ये तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी २६ जानेवारी २०१३ रोजी आपल्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर न्याय देऊ, असे पत्र दिल्याने आपण उपोषण मागे घेतल्याचे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.खेड तहसीलदारांनी ७ फेब्रुवारी २०१३ रोजी तहसील कार्यालयामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, आम्ही कुटुंबीय, उपजिल्हा अधिकारी नितीन राऊत आणि दापोली उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र पाटील यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये संदीप कासार याला नातूवाडी पाटबंधारे प्रकल्पात नोकरी देऊ, असे आश्वासन उपजिल्हाधिकारी राऊत व दापोलीचे उपविभागीय अधिकारी पाटील यांनी याच बैठकीत सर्वांसमक्ष दिले व आम्हाला १४ फेब्रुवारी २०१३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील कार्यालय, खेड यांच्याकडे फॅक्सने पत्र देण्यात आले. ते पत्र आम्हाला तहसीलदार, खेड यांच्यामार्फत देण्यात आले. कंत्राटी पद्धतीवर जेव्हा जागा खाली होतील तेव्हा तुमचा विचार होईल, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले होते.कंत्राटी पद्धतीवरचे पत्र पाठवून आपची दिशाभूल केली गेली, म्हणून पुन्हा १ मे २०१३ रोजी आत्मदहनाचा इशारा आपण दिला. त्यावेळी तहसीलदारांनी तत्कालिन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यावर तुमच्या मागणीच्या निर्णयासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ८ मे २०१३ रोजी बैठक आयोजित केल्याचे आपल्याला सांगण्यात आले.चिपळूण येथील १० वर्षांपूर्वी बंद झालेल्या पाटबंधारे कार्यालयाचे पत्र आम्हाला देण्यात आले होते. ते आम्ही जिल्हाधिकारी जाधव यांना दाखविले. त्यानंतर जाधव यांनी पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता यांना सांगितले की, या कुटुंबाला निर्णय देऊन तुम्हीच नोकरी द्या.शासकीय अधिकाऱ्यांकडून आपली सातत्याने दिशाभूल केली गेली आणि आमच्या मुलाला नोकरीपासून वंचित राहावे लागले आहे. म्हणून आता कुटुंबासह आत्मदहन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे कासार यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. पत्रामध्ये कंत्राटी पध्दतीवर जागा खाली होतील तेव्हा तुमचा विचार होईल असे सांगण्यात आले. मात्र प्रतय्क्षात आमची दिशाभऊल केल्यामुळे या सर्व घडामोडीत आमच्यावर अन्याय भावना कासार यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)कोणालाही नोकरी दिली नाही...तुळशी येथील लक्ष्मण कासार यांनी नातूवाडी धरण प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेताना कुटुंबातील एका व्यक्तीला कामावर घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र याबाबत कोणतेही आश्वासन पाळण्यात आलेले नाही. या सर्व प्रकाराने कुटुंब उध्वस्त होत असून या प्रकरणी शेवटचा उपाय म्हणून आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
प्रकल्पग्रस्ताचा आत्मदहनाचा इशारा
By admin | Published: April 27, 2015 10:18 PM